हिंगोलीत शेतातील आखाड्यावर सशस्त्र दरोडा; 7 लाखांचा ऐवज लंपास, एक जखमी

हिंगोली: सेनगाव तालुक्यातील घोरदरी येथील शेत शिवारात 5 जून रोजी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास चार दरोडेखोरांनी अशोक माणिक साबळे यांच्या आखाड्यावर दरोडा टाकला. काळ्या रुमालाने तोंड बांधलेल्या या चोरट्यांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली.
सुशिलाबाई माणिक साबळे आणि रुक्मिणा आसाराम साबळे यांच्या अंगावरील मंगळसूत्र, हातातील कडे, गळ्यातील गहू पोत यासह सर्व दागिने हिसकावले. चोरट्यांनी “आवाज केला तर मारून टाकू” अशी धमकी देत सर्वांना एका खोलीत कोंडले आणि मोबाइल फेकून घराला बाहेरून कडी लावली.
अशोक साबळे यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी त्यांच्या हातावर चाकूने वार केले, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. पहाटे 4 वाजता कुटुंबीय बाहेर आल्यानंतर गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. अशोक यांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सेनगाव पोलिस ठाण्यात माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक दीपक मस्के यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनी पाहणी केली, परंतु चोरट्यांचा माग लागला नाही.
पोलिसांनी चार पथके स्थापन करून तपास सुरू केला असून, संशयितांची चौकशी सुरू आहे. घटनेच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यानेही संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.





