Eco Friendly Diwali: मुलांचा फटाक्यांसाठी हट्ट? ‘या’ ५ भन्नाट पद्धतींनी साजरी करा इको-फ्रेंडली दिवाळी!
Eco Friendly Diwali मुलांनी फटाके फोडण्याचा हट्ट केला तर त्यांना थेट नकार देण्याऐवजी फटाक्यांमुळे होणारे नुकसान समजावून सांगा. फटाक्यांच्या धुरामुळे हवेचे प्रदूषण वाढते, तर मोठ्या आवाजामुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि प्राण्यांना त्रास होतो, हे त्यांना सोप्या भाषेत सांगा. स्वच्छ हवा आणि शांत वातावरण हेदेखील दिवाळीच्या आनंदाचा भाग आहेत, याची जाणीव करून द्या. मुलांना पर्यावरणाचे महत्त्व समजल्यास ते स्वतःहून फटाक्यांपासून दूर राहण्याचा विचार करू शकतात.

Eco Friendly Diwali: दिवाळी म्हटलं की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फटाके फोडण्याची आणि आतषबाजी पाहण्याची उत्सुकता असते. विशेषतः मुलं दिवाळी जवळ आली की फटाक्यांचा हट्ट करू लागतात. रंगीबेरंगी फुलबाज्या, अनार आणि आकाशात चमकणाऱ्या आतषबाजीचं त्यांना विशेष आकर्षण असतं. मात्र, फटाक्यांमधून बाहेर पडणारा धूर आणि मोठ्या आवाजामुळे पर्यावरणासह माणसांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि पाळीव प्राण्यांनाही याचा त्रास सहन करावा लागू शकतो.
अशा परिस्थितीत पालकांसमोर मुलांचा फटाके फोडण्याचा हट्ट कसा कमी करायचा आणि त्यांचा सणाचा उत्साहही कसा टिकवून ठेवायचा, असा प्रश्न असतो. मुलांना रागावण्याऐवजी प्रेमाने फटाक्यांचे दुष्परिणाम समजावून सांगणे अधिक योग्य ठरते. त्याचबरोबर त्यांना दिवाळीच्या तयारीत सहभागी करून घेतल्यास फटाक्यांशिवायही सणाचा आनंद घेता येतो. यासाठी काही सोप्या आणि मजेदार गोष्टी करता येतील. जाणून घेऊया मुलांसोबत इको-फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याचे पाच भन्नाट पर्याय.
१. फटाक्यांचे दुष्परिणाम मुलांना प्रेमाने समजावून सांगा
मुलांनी फटाके फोडण्याचा हट्ट केला तर त्यांना थेट नकार देण्याऐवजी फटाक्यांमुळे होणारे नुकसान समजावून सांगा. फटाक्यांच्या धुरामुळे हवेचे प्रदूषण वाढते, तर मोठ्या आवाजामुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि प्राण्यांना त्रास होतो, हे त्यांना सोप्या भाषेत सांगा. स्वच्छ हवा आणि शांत वातावरण हेदेखील दिवाळीच्या आनंदाचा भाग आहेत, याची जाणीव करून द्या. मुलांना पर्यावरणाचे महत्त्व समजल्यास ते स्वतःहून फटाक्यांपासून दूर राहण्याचा विचार करू शकतात.
२. रंगीबेरंगी रांगोळी काढण्यात मुलांना सहभागी करा
दिवाळीत रांगोळीला विशेष महत्त्व असते. मुलांचा फटाक्यांवरील हट्ट कमी करण्यासाठी त्यांना रांगोळी काढण्यात सहभागी करून घ्या. वेगवेगळ्या रंगांचा वापर करून सुंदर रांगोळी काढायला सांगा. त्यासाठी फुलं, पानं आणि नैसर्गिक रंगांचाही वापर करता येईल. पालकांनी मुलांसोबत रांगोळी काढल्यास त्यांना अधिक मजा येईल. यामुळे त्यांची कल्पकता आणि सर्जनशीलताही वाढण्यास मदत होईल.
३. दिवे रंगवण्यासह घराच्या सजावटीची जबाबदारी द्या
दिवाळी म्हटलं की पणत्या, दिवे आणि घराची सजावट आलीच. अशावेळी मुलांना मातीच्या पणत्या रंगवण्याची संधी द्या. त्यांच्या आवडीचे रंग वापरून पणत्या सजवायला सांगा. घर सजवताना फुलं, तोरणं आणि इतर सजावटीच्या वस्तू तयार करण्यातही त्यांना सहभागी करून घ्या. यामुळे मुलांना सणाच्या तयारीत सहभागी होता येईल. तसेच स्थानिक कुंभारांकडून मातीच्या पणत्या खरेदी केल्यास स्थानिक कारागिरांनाही मदत होईल.

Eco Friendly Diwali
४. मुलांसोबत तयार करा दिवाळीचे खास पदार्थ
दिवाळी म्हटलं की फराळाची लगबग सुरू होते. या तयारीत मुलांनाही सहभागी करून घ्या. त्यांच्यासोबत लाडू, नारळाची वडी, चॉकलेट किंवा इतर आवडीचे गोड पदार्थ तयार करा. पदार्थ बनवताना मुलांना छोटे-छोटे काम द्या. मात्र, गॅस, गरम तेल, गरम भांडी आणि धारदार वस्तूंपासून त्यांना दूर ठेवा. मोठ्यांच्या देखरेखीखाली फराळ तयार करण्याचा अनुभव मुलांसाठी आनंददायी ठरू शकतो.
५. दिवाळीनिमित्त गेम्स आणि सरप्राइज गिफ्टचे आयोजन करा
मुलांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी दिवाळीत काही खास खेळांचे आयोजन करा. दीया सजावट स्पर्धा, रांगोळी स्पर्धा किंवा दिवाळीशी संबंधित प्रश्नमंजुषा आयोजित करू शकता. यामध्ये मुलांना सहभागी करून घ्या आणि विजेत्यांना छोटीशी भेटवस्तू द्या. याशिवाय मुलांना त्यांच्या आवडीचे सरप्राइज गिफ्टही देता येईल. अशा उपक्रमांमुळे मुलांना फटाक्यांशिवायही दिवाळीचा आनंद घेता येईल.
मुलांना लहानपणापासूनच पर्यावरणाची काळजी घ्यायला शिकवा!
मुलांना केवळ फटाके फोडू नका, असं सांगणं पुरेसं नाही. तर पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी काय आहे, हेही त्यांना समजावून सांगणं महत्त्वाचं आहे. यासाठी पालकांनी स्वतःही फटाक्यांपासून दूर राहून मुलांसमोर आदर्श ठेवायला हवा. दिवाळीचा खरा आनंद इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात आहे, हे मुलांना सांगा.
या सणानिमित्त गरजू मुलांना मिठाई, कपडे किंवा खेळणी देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. तसेच पक्षी आणि पाळीव प्राण्यांना मोठ्या आवाजाचा त्रास होतो, याची जाणीव करून द्या. त्यांच्याप्रती संवेदनशील राहण्याची सवय मुलांमध्ये लहानपणापासूनच रुजवायला हवी.
यंदाची दिवाळी ठरू द्या खास!
दिवाळीत मुलांचा आनंद जपण्यासोबतच पर्यावरण आणि आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मुलांचा फटाक्यांचा हट्ट प्रेमाने समजावून आणि वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करून कमी करता येऊ शकतो. यंदा फटाक्यांऐवजी पणत्या, रांगोळी, फराळ आणि कुटुंबासोबत घालवलेल्या आनंदी क्षणांनी दिवाळी साजरी करा. कारण दिवाळीचा खरा प्रकाश फटाक्यांमध्ये नाही, तर आपल्या आनंदात आणि माणुसकीत आहे.



