World Mental Health Day: सतत थकवा, चिडचिड आणि अस्वस्थता जाणवतेय? मानसिक आरोग्याचे ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका!
World Mental Health Day दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणं, मानसिक समस्यांवर मोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहन देणं आणि गरज असलेल्या व्यक्तींना मदत मिळवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

World Mental Health Day: आजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक अडचणींमुळे अनेकजण मानसिक तणावाचा सामना करत आहेत. सतत थकवा जाणवणे, छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड होणे, झोप न लागणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय अस्वस्थ वाटणे, अशा लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. मात्र, हे बदल दीर्घकाळ टिकून राहिले आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागले, तर मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणं, मानसिक समस्यांवर मोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहन देणं आणि गरज असलेल्या व्यक्तींना मदत मिळवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. २०२६ मधील थीम आहे, ‘Lived experiences heard: real voices, real change’. म्हणजेच मानसिक आरोग्याच्या समस्यांचा अनुभव घेतलेल्या व्यक्तींचं म्हणणं ऐकून घेणं आणि त्यांच्या अनुभवांना महत्त्व देणं.
तणाव, नैराश्य आणि चिंतेची लक्षणं कशी ओळखाल?
तणाव, नैराश्य (डिप्रेशन) आणि चिंता (ॲन्झायटी) या वेगवेगळ्या मानसिक अवस्था आहेत. त्यांची काही लक्षणं सारखी असू शकतात; मात्र त्यांची कारणं आणि उपचार वेगवेगळे असू शकतात.
१. सतत उदास वाटणं : अनेक दिवस मन उदास राहणं, निराशा जाणवणं किंवा आधी आवडणाऱ्या गोष्टींमध्ये रस कमी होणं, ही नैराश्याची संभाव्य लक्षणं असू शकतात. अशी स्थिती दीर्घकाळ टिकल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
२. विनाकारण अस्वस्थता : भविष्यात काहीतरी वाईट घडेल अशी भीती वाटणं, छोट्या गोष्टींचाही सतत विचार करणं, चिंता नियंत्रणात ठेवणं कठीण जाणं किंवा बेचैनी जाणवणं ही चिंतेची लक्षणं असू शकतात.
३. झोप आणि भुकेत बदल : रात्री झोप न लागणं, वारंवार जाग येणं, नेहमीपेक्षा जास्त झोप येणं किंवा भुकेत बदल होणं, याकडे लक्ष देणं आवश्यक आहे.
४. एकाग्रता कमी होणं : कामात लक्ष न लागणं, गोष्टी विसरणं, निर्णय घेण्यात अडचण येणं किंवा रोजची कामं करणं कठीण वाटणं, हेही मानसिक आरोग्याशी संबंधित बदल असू शकतात.
५. चिडचिड आणि एकटं राहण्याची इच्छा : छोट्या गोष्टींवर राग येणं, मित्र-परिवारापासून दूर राहणं किंवा कोणाशीही बोलावंसं न वाटणं, अशी लक्षणं वारंवार जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

World Mental Health Day
मानसिक आरोग्यासाठी कोणत्या सवयी महत्त्वाच्या?
मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी रोजच्या जीवनशैलीत काही बदल करणं उपयुक्त ठरू शकतं.
- चहा-कॉफीचं प्रमाण मर्यादित ठेवा : जास्त कॅफीनमुळे काही व्यक्तींमध्ये अस्वस्थता आणि झोपेच्या समस्या वाढू शकतात.
- नियमित आणि संतुलित आहार घ्या : जेवणाच्या वेळा पाळा. आहारात डाळी, भाज्या, फळं, संपूर्ण धान्य आणि प्रथिनांचा समावेश करा.
- पुरेशी झोप घ्या : झोपण्याची आणि उठण्याची वेळ नियमित ठेवा.
- शारीरिक हालचाल करा : चालणं किंवा आवडता हलका व्यायाम केल्याने मनःस्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते.
- विश्वासू व्यक्तींशी बोला : मनातील भावना दाबून ठेवण्याऐवजी विश्वास असलेल्या व्यक्तीशी संवाद साधा. मद्यपान टाळणंही महत्त्वाचं आहे.
नैराश्य जाणवत असल्यास काय करावं?
उदासीनता, निराशा किंवा आवडत्या गोष्टींमधील रस कमी होणं अशी लक्षणं सतत जाणवत असतील, तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या. गरजेनुसार समुपदेशन, मानसोपचार किंवा डॉक्टरांनी सुचवलेली औषधं उपयोगी ठरू शकतात. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT) ही काही मानसिक समस्यांसाठी वापरली जाणारी उपचारपद्धती आहे. उपचार व्यक्तीच्या गरजेनुसार ठरवले जातात.
भारतात टेली-मानस (Tele-MANAS) १४४१६ या क्रमांकावर मोफत मानसिक आरोग्यविषयक मदत मिळू शकते. ही सेवा २४ तास उपलब्ध आहे.
लक्षात ठेवा, मानसिक आरोग्याची समस्या असणं ही कमजोरी नाही. योग्य वेळी मदत घेणं आणि आपल्या भावनांना समजून घेणं महत्त्वाचं आहे. मानसिक आरोग्याबद्दल बोला, स्वतःची काळजी घ्या आणि गरज असेल तेव्हा मदत मागण्यास संकोच करू नका.





