आम्ही काय सावत्र बहिणी आहोत काय? एकल महिलांचा मुख्यमंत्र्याना संतप्त सवाल

नेवासा (प्रतिनिधी) – लाडक्या बहिणींना अन् आम्ही एकल ( विधवा ) आमचे उत्पन्न २१ हजार तरीही दरमहा १ हजार ५०० रुपये देणार आहात. आम्ही काय आपल्या सावत्र बहिणी आहोत काय? असा संतप्त सवाल नेवासा तालुका एकल महिलांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विचारला असुन दरमहा ५ हजार रुपये मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
नेवासा तालुका साऊ एकल माहिला समितीच्या वतीने तालुक्यातील एकल महिलांचे निवेदन अप्पर तहसिलदार तथा परिविक्षाधिन उप जिल्हाधिकारी विशाल यादव यांना अनिता गटकळ , संगीता नवले , क्रांती भालेकर , वर्षा गायकवाड , उज्ज्वला सोनपुरे , स्वाती फाळके , उषा भालेराव , तसेच समितीचे कार्यकर्ते कारभारी गरड , अप्पासाहेब वाबळे , भारत आरगडे , येडुभाऊ सोनवणे व रेणुकाताई चौधरी यांनी दिले.
काय लिहिले निवेदनात ?
निवेदनात म्हटले आहे की भाऊ , दादा आपण उत्पन्नाची अट नसलेल्या व ज्यांना आयुष्याचा साथीदार आहे अशा आपल्या लाडक्या बहिणीसाठी दरमहा १ हजार ५०० रुपये देणार आहात. त्याबद्दल समाधान. पण अरे भाऊ अन् दादा आम्ही काय आपल्या सावत्र बहिणी आहोत काय? कारण आमचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपये त्यातही आम्ही एकल .आम्हालाही संजय गांधी निराधार , इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेचे मिळणार दरमहा १ हजार ५०० रुपये. भाऊ, दादा हा फरक कशासाठी रे? इतरांना पैसे मिळू नये असे आमचे म्हणणे मुळीच नाही .परंतु आमचे उत्पन्न व एकल पणा, मुला – बाळाच्या जबाबदाऱ्या पहाता आम्हाला दरमहा ५ हजार रुपये तरी मिळावेत. तसेच ६५ वर्षांपुढील अनेक वृद्ध एकल महिला आहेत. त्यांना ना घरातील लेक – सून , मुलं – मुली सन्मानाने वागवतात , ना समाजात स्थान .अनेकांना आपल्या दैनंदिन उपजिविकेची, औषधोपचाराची भ्रांत असत अशांनाही किमान ५ हजार रुपये रक्कम दरमहा मिळावेत अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली आहे.
काय आहे लाडकी बहीण योजना ?
ही योजना 21 ते 60 वर्षे वय असलेल्या महिलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. १ जुलैपासून या योजेनच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.
काय लागणार कागदपत्रे?
१) सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.1 जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसंच 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 01 जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
२) या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे 1. रेशन कार्ड 2. मतदार ओळखपत्र 3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4. जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे.
३) सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
४) सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे.
५) परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1. जन्म दाखला 2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.
६) रु.2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येणार आहे.
७) सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.





