Posted by Amit Thackeray : मुंबई आणि ठाण्यात महापौर पदावरून भाजप-शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. घोडेबाजार टाळण्यासाठी शिंदेंनी मोठी खेळी करत मुंबई पालिकेवर निवडून आलेल्या शिवेसेनेच्या २९ नगरसेवकांना ताज हॅाटेलमध्ये ठेवले आहे. त्यांचा मुक्काम आणखी वाढविण्यात आला आहे. अशातच आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे चार नवनिर्वाचित नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या सगळ्यावर भाष्य करणारी एक पोस्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टसोबत अमित ठाकरे यांनी व्यंगचित्र देखील शेअर केले आहे. नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत? निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते, लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती. पण दुर्दैवाने, ज्यांना जनतेने निवडून दिलंय, ते आज फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दाराआड ‘आनंदाने’ कैद आहेत, अशा शब्दांत अमित ठाकरेंनी शिंदेंच्या नगरसेवकांवर जोरदार निशाणा साधला आहे. पोस्टमध्ये ते पुढे असे म्हणाले आहे की, याला नक्की कारण काय? स्वतःच्याच सहकाऱ्यांवरचा अविश्वास? स्वार्थी राजकारण? या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केले त्यांचा अपमान नाही का होतं? किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचे राजकारण? असे सवाल अमित ठाकरे यांनी पोस्टमध्ये विचारले आहेत. या सगळ्या नाटकामध्ये ज्या पर्यटकांनी स्वतःचे कष्टाचे पैसे भरून हॉटेल बुकिंग केलं आहे, त्यांनाही सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागतोय. लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आता तरी थांबवा! ‘जमल्यास’… ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलाय तिच्यासाठी काहीतरी करा. असे आवाहन अमित ठाकरे यांनी केले आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. हेही वाचा : Parveen Babi: टाइम मॅगझिनच्या कव्हरवर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री; परवीन बॉबींचा थक्क करणारा प्रवास