मेहनतीचं फळ! रस्त्यावर भाजी विकणारा तरुण तिरंदाजी World Cup मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार

लखनौ – करोना काळात रस्त्यावर आलेले कुटुंब, व हलाकीची परिस्थिती व शारीरिक व्यंग यावर यशस्वी मात करत उत्तर प्रदेशचा तिरंदाज नीरज चौहान याची आगामी आशियाई तिरंदाजी तसेच विश्वकरंडक तिरंदाजी संघात निवड झाली आहे. या स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी तो सज्ज बनला आहे.
नीरजने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले कुटुंब सांभाळताना देशाकडून खेळण्याचे स्वप्नही पूर्णत्वाला आणण्याचे अशक्य आव्हान शक्य केले आहे. नीरज आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच त्यानंतर होणारी तिरंदाजी विश्वकरंडक स्पर्धांत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. नीरज सोनीपत येथे झालेल्या तिरंदाजी चाचणीत पात्र ठरला. यात दुसरे स्थान मिळवत निरजने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले. नीरजचे वडील अक्षयलाल हे मेरठमध्ये एक आचारी म्हणून काम करतात. ते येथील प्रकाश स्टेडियममधील हॉटेलमध्ये कार्यरत आहेत.
या स्टेडियमवरच अन्य खेळाडूंचा सराव पाहात पाहात नीरजनेही तिरंदाजीचा सराव सुरू केला. मात्र, करोनाच्या काळात वडिलांची नोकरी गेली आणि सगळे चित्रच बदलले. नीरजचा मोठा भाऊ सुनील चौहान मुष्टियोद्धा असून या दोन्ही भावांनी भाजीपाला विकून
घर चालवले.
सोशल मीडियामुळे मिळाली मदत
या दोन भावांच्या या मेहनतीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याची दखल तत्कालीन केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी घेतली व त्यांना आर्थिक मदतही पोहोचवली. त्यानंतर नीरजची क्रीडापटूंसाठी राखीव असलेल्या कोट्यातून आयटीबीपीमध्ये निवड झाली. आशियाई क्रीडा स्पर्धा यंदा नोव्हेंबरमध्ये जकार्ता येथे तर, एप्रिलमध्ये तुर्कीत विश्वकरंडक तसेच अमेरिकेत जागतिक क्रीडा स्पर्धा होणार असून त्यात यश मिळवण्यासाठी नीरज सज्ज बनला आहे.



