नवी दिल्ली – देशभरातील काही निवडक पूजास्थाने असलेल्या पुरातन वास्तू उघडण्याचा निर्णय केंद्र सरकारने कालच जाहीर केला. मात्र, चार राज्यांमधील करोनाची स्थिती अद्याप आटोक्यात आलेली नसल्याने या पुरातन वास्तू पर्यटक आणि नागरिकांच्या भेटीसाठी खुल्या न करण्याचा निर्णय चार राज्यांमधील सरकारांनी घेतला आहे. राजस्थान, महाराष्ट्र, तमिळनाडू, ओडिशा आणि जम्मू-काश्मीरमध्ये पूजास्थळे असणारी पुरातन वास्तू बंदच राहणार आहेत.
रविवारी जारी केलेल्या आदेशानुसार केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने 8 जूनपासून पुरातत्व खात्याकडून संरक्षित 820 वास्तू पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली; परंतु तेथील परिस्थितीनुसार त्याठिकाणी अंतिम निर्णय घेण्याची परवानगी स्थानिक अधिकाऱ्यांना दिली आहे.
सध्याच्या करोनाच्या साथीमुळे महाराष्ट्रातील 65, राजस्थानमधील 28, ओडिशामधील 46, तमिळनाडूमधील 75 आणि जम्मू-काश्मीरमधील नऊ अशी स्मारके बंद राहतील. आग्य्रातील सर्व 18 पुरातन वास्तू बंदच ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. ऐतिहासिक ताजमहालाजवळील तीन पूजास्थाने, फतेहपुरी मशीद आणि काली मशीदही उघडण्यास सांस्कृतिक मंत्रालयाने परवानगी दिली असली, तरी स्थानिक अधिकाऱ्यांनी ही ठिकाणे न उघडण्याचा निर्णय घेतला.
ओडिशामध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. पुरी येथील लिंगनाथ मंदिर, मुक्तेश्वर मंदिर, अनंत वासुदेव आणि इतर प्राचीन शैव मंदिरे, हीरापूर येथील 64 योगिनी पीठ आणि धेंकनालमधील कपिलाश पीठ तोपर्यंत बंद राहतील.
दिल्लीत मात्र कुतुब पुरातन वास्तू आणि हुमायूं स्मारकाजवळील अफसाह वाला की मशीद येथे या शुक्रवारी नमाज पठण होणार आहे.