Pimpri : ‘पीएमपी’चा मनमानी कारभार; रस्त्याच्या मध्येच बस थांबवून उतरवले जातात प्रवासी

भोसरी : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पीएमपीएमएल बस सेवेचा मनमानी कारभार आता नागरिकांच्या सहनशीलतेच्या सीमेलाही पार गेला आहे. बस चालक रस्त्याच्या मध्यभागी थांबून प्रवाशांची चढ-उतार करताता. त्यामुळे एकीकडे वाहतूक कोंडी तर दुसरीकडे अपघाताचा धोका वाढत चालला आहे.
भोसरी आणि परिसरातील मुख्य रस्त्यांवर, विशेषतः पूलाजवळ ही समस्या तीव्रपणे जाणवत आहे. बस थांब्यांना डावलून रस्त्याच्या मधोमध थांबणाऱ्या बसमुळे मागून येणाऱ्या वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावा लागतो. यामुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणं आहे.
नागरिकांनी अनेक वेळा पीएमपी प्रशासन व वाहतूक पोलिसांकडे तक्रार केल्यावरही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. “बस थांबे सोडून रस्त्यात बस थांबवली जाते, यामुळे आम्हा वाहनचालकांना अडथळा निर्माण होतो आणि पादचाऱ्यांना देखील जीव धोक्यात घालावा लागतो,” असा संतप्त सूर वाहनधारक आणि प्रवाशांमध्ये आहे.
या बेजबाबदार वर्तनामुळे शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असून, प्रवासी आणि नागरिक यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बसचालक व वाहकांना नियमांचे पालन करण्याचे स्पष्ट आदेश देणे, बस थांबे ठळकपणे चिन्हांकित करणे आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
अन्यथा प्रशासनच जबाबदार
शहरवासीयांची मागणी आहे की, वाहतूक पोलीस आणि पीएमपी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन शहराच्या सुरळीत वाहतुकीसाठी योग्य ती पावले उचलावीत, अन्यथा उद्भवणारे अपघात आणि गोंधळ यासाठी प्रशासनच जबाबदार ठरेल.





