पुणे जिल्हा | दौंडच्या भूमी अभिलेख कार्यालयात मनमानी

देऊळगावराजे, (वार्ताहर)- दौंड येथील भूमी अभिलेख कार्यालयामधील अधिकारी शेतकऱ्यांना अश्लील भाषा व दमदाटी करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कार्यालयामध्ये शेतकरी जमिनीची मोजणी हद्द कायम करणे, जुने नकाशे, फेरफार, शेती संबंधित सर्वच कागदपत्रे काढण्यासाठी येतात. त्यामुळे कायम शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते.
याच कामानिमित्त पूर्व भागातील शेतकरी तेथे गेले असता वरिष्ठ अधिकारी यांनी शेतकऱ्याला दमदाटी केली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांच्याविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
दौंड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील आधिकरी यांच्यावर कोणाचाही वचक राहिलेला नसून अधिकाऱ्यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेकवेळा कार्यालयामध्ये काही अधिकारी दिवसभर कार्यालयात बसत नाहीत. त्यामुळे येथे फक्त खुर्च्या व दालन दिवसभर कर्मचाऱ्यांच्या विना रिकामे दिसत आहे.
शेतकरी शेतजमिनीची लवकरात लवकर मोजणी करून हद्द कायम करण्यात यावी, यासाठी शेतकरी साध्या फीपेक्षा चौपट जादा फी भरत आहेत. मात्र, काम पूर्ण करण्यासाठी चार ते सहा महिने विनाकारण हेलपाटे मारावे लागत आहे. मोजणीच्या तारखा होऊन सुद्धा वेळेवर मोजणी व हद्द कायम या अधिकाऱ्यांकडून होत नाही.
याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे बोलून सुद्धा वेळेवर काम होत नाही. काम झाले तर अधिकारी शेतकऱ्यांकडे धनलक्ष्मीची मोठ्या प्रमाणात मागणी करीत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे शेतकरी अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
दौंड भूमी अभिलेख कार्यालयामधील अधिकारी हे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात धनलक्ष्मीची मागणी करीत आहेत. कार्यालयात प्रकार घडला आहे. तो माझ्या समोरच झाला असून त्यादिवशी असे अनेक प्रकार झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांने केले आहे, त्यामुळे वरिष्ठ पदावर असलेला अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे; अन्यथा न्याय मार्गाने कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल.- शहानूर इनामदार, देऊळगावराजे.





