स्थायी समिती सभा ः अन्य कामांनाही मिळाली मान्यता पिंपरी – करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी रूग्णालयातील साहित्य व उपाययोजानासाठी साहित्य खरेदी करण्यच्या विषयासह विविध कामांसाठी एकूण 15 कोटी 17 लाख रूपये खर्चास स्थायी समितीने शुक्रवारी (दि.8) मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयामध्ये करोना साथीच्या रोगावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या पीपीई कीटच्या 69 लाख खर्चास कार्योत्तर मंजूरी देण्यात आली. तसेच पालिकेच्या विविध रुग्णालयामध्ये फेस मास्क खरेदीसाठी 31 लाख 80 हजार खर्चास मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना 31 जानेवारी 2020 पर्यंत 3 हजार 151 मोफत पास देण्यात आले आहेत. पाससाठी 4 कोटी 85 लाख रुपये मंजूर झाले असून त्यातील शिल्लक 1 कोटी 85 लाख रक्कम पीएमपीएला देण्यास मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी अथवा अत्यधिक गरीब यांचे कल्याण पुनर्वसन आणि या घटकांना समजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समीर घोष यांची 2 वर्ष कालावधीकरिता सल्लागार म्हणून फेरनियुक्तीस मंजुरी देण्यात आली. त्यासाठी 39 लाख 60 हजार मानधन दिले जाणार आहे. टेल्को रस्त्यावरील इलेक्ट्रोनिक सदन चौकातील सीडी वर्क रुंद करणे. नाला बांधणे या स्थापत्य विषयक कामासाठी 1 कोटी 20 लाख खर्चास मंजूरी देण्यात आली. शहरातील 36 स्मशानभूमी व दफनभूमीमध्ये दररोज तीन पाळयांमध्ये सुरक्षा काळजीवाहक किमान वेतनदराने 2 वर्ष कालावधीसाठी पुरविण्यासाठी 29 लाख 80 हजार इतक्या खर्चास मंजुरी देण्यात आली. पाणीपुरवठा ग्राव्हिटी विभागामार्फत असलेल्या जल क्षेत्रांसाठी परिचारण व देखभाल दुरूस्ती कामसाठी मुदतवाढ देण्यासाठी 1 कोटी 98 लाख खर्चास मंजुरी देण्यात आली. थेरगाव गुरुत्ववाहिनीवरील देखभाल दुरूस्तीची कामे करणे आणि व्हाल्व्ह बदलणे व इतर अनुषंगिक कामासाठी 31 लाख 87 हजार खर्चास मंजुरी देण्यात आली.