पुणे जिल्हा | खडकवासला- फुरसुंगी बोगदा प्रकल्पास मान्यता

दौंड, (प्रतिनिधी)- खडकवासला प्रकल्पाच्या नवीन मुठा उजवा कालवा कि. मी. १ ते ३४ साठी २७ किमी पर्यायी खडकवासला- फुरसुंगी बोगदा प्रकल्पाच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
सुमारे २१९०.४७ कोटी रुपये निधी खर्च केला जाणार आहे. ३ टीएमसी पाण्याची बचत होणार असून दौंड, हवेली, इंदापूर व बारामती तालुक्यांतील हजारो हेक्टर शेतीला लाभ होणार आहे. आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.
खडकवासलाच्या नवीन मुठा उजवा कालव्याचा किमी १ ते ३४ लांबीचा भाग पुणे पालिकेच्या हद्दीतून जात असल्याने पुणे शहराची सर्वांगीण बाजूने होणारी वाढ, झोपडपट्टी, अतिक्रमणे व पर्यायाने होणारे जलप्रदूषण,
जलनाश यामुळे कालव्याची होत असलेली हानी व त्यामुळे वहनक्षमतेत झालेली घट टाळण्यासाठी नवीन मुठा उजवा कालव्याच्या कि. मी. १ ते ३४ मधील लांबीसाठी २७ किमी पर्यायी खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत बोगदा करावा,
अशी मागणी आमदार कुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. विधानसभा सभागृहात देखील वेळोवेळी प्रश्न, लक्षवेधी चर्चा, अर्धातास चर्चा अशा आयुधाच्या माध्यमातून चर्चा उपस्थित केली होती.
याबाबत शासनस्तरावर अनेक बैठका घेतल्या होत्या. दि. १९ ऑगस्ट रोजी बैठकीत हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री फडणवीस यांनी दिले होते. आमदार कुल यांच्या या पाठपुराव्याला मोठे यश आले असून, या प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
अस्तरीकरण व मजबूतीकरणसाठी १८८.७५ कोटी
जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) किमी. ४३ (कुंजीरवाडी – लोणीकाळभोर) ते किमी १०९ (भागवतवस्ती पाटस) एकूण ६७ किमी लांबीच्या अस्तरीकरण व मजबूतीकरणसाठी १८८.७५ कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे. त्याची निविदा प्रकिया पूर्ण झाली आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रूपांतरित व अस्तरीकरणाच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया करावी, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या असून त्याला लवकरच मान्यता मिळेल, असे आमदार कुल यांनी सांगितले





