Krunal Pandya | गावसकरांकडून कृणालचे कौतुक

पुणे – कृणाल पंड्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. या सामन्यात त्याने फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात अफलातून कामगिरी केली. त्याच्या या खेळावर विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी स्तुतिसुमने उधळली आहेत.
पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात पंड्याने केवळ 26 चेंडूत अर्धशतक फटकावले होते. ही खेळी पाहिल्यावर गावसकर यांनी कृणालचे कौतुक केले आहे. त्याची फलंदाजी पाहून गावसकर यांनी त्याच्या गुणवत्तेलाही सलाम केला असून असेच जिद्दी खेळाडू भारतीय संघाचे भविष्य उज्ज्वल करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
कृणाल त्याचा पदार्पणाचा सामना खेळत होता. अशा सामन्यात अशी फलंदाजी करणे सोपे नाही. खेळपट्टीवर आल्यापासून तो पूर्ण सेट असल्यासारखा खेळत होता. असे वाटत होते की जणू तो ड्रेसिंगरूममधूनच सेट होऊन आलेला आहे. त्याच्या खेळत खेळभावना दिसली.
त्याने सुरुवातीला आक्रमक फटके खेळून लोकेश राहुलवरचा दबाव दूर केला. राहुल गेल्या काही सामन्यांमध्ये धावांसाठी झगडत होता, त्यालाही कृणालच्या खेळाने आत्मविश्वास मिळाला, असेही गावसकर म्हणाले.





