पुणे – अपात्रतेच्या कारणावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरील शंभरहून अधिक सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. विद्यापीठाने स्वत:ची चूक मान्य केली असून, त्यावरून सर्व नियुक्त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया पारदर्शीपणे नव्याने राबवावी आणि अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुका तत्काळ स्थगित करावी, अशी मागणी अधिसभा सदस्यातून होत आहे.
यासंदर्भात परिपत्रक कुलसचिव
डॉ. प्रफुल्ल पवार यांनी प्रसिद्ध केले. त्यात वगळण्यात आलेल्या अपात्र सदस्यांची नावे जाहीर केली. ही संख्या शंभरहून अधिक असून, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष तोंडावर असताना अभ्यासक्रम निश्चित करणारे काही सदस्य अपात्र ठरल्यामुळे संपूर्ण प्रक्रियाच लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येत आहे.विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकविल्या जाणाऱ्या प्रत्येक विषयासाठी एक अभ्यासमंडळ असते. ज्यावर निवड झालेले सदस्य संबंधित विषयाच्या अभ्यासक्रमाचाआराखडा निश्चित करतात. अभ्यासक्रमात सुधारणा करणे, स्थानिक गरजांनुसार रचना करण्याचे स्वातंत्र्य या मंडळाला असते. त्यामुळे अभ्यास मंडळाची नियुक्ती महत्त्वाचे आहे.मात्र ही नियुक्तीच बेकायदेशीरपणे झाल्याचा आरोप होत आहे.
नियुक्ती प्रक्रिया पुन्हा राबवा अन्यथा आंदोलन
विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर बेकायदेशीरपणे नामनिर्देशित करण्यात आली आहे. त्यामुळे अभ्यास मंडळावर सर्व नियुक्ती रद्द करावी. त्यामुळे अभ्यास मंडळाची नामनिर्देशित प्रक्रिया पारदर्शकपणे पुन्हा राबवावी. अन्यथा दि. 5 जून रोजी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अधिसभा सदस्य प्रा. हर्ष गायकवाड यांनी दिला आहे.