रेल्वे बोर्डच्या अध्यक्षपदी सतीश कुमार यांची नियुक्ती

नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा अधिकारी सतीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाच्या इतिहासात ते अनुसूचित जातीतून आलेले पहिले चेअरमन आणि सीईओ ठरले आहेत. बोर्डाच्या विद्यमान अध्यक्षा आणि सीईओ जया वर्मा सिन्हा 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सतीश कुमार यांची अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर निवड केली आहे. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ 1 सप्टेंबरपासून सुरू होणार असून तो निवृत्तीपर्यंत राहील. जया वर्मा यांनी 1 सप्टेंबर 2023 रोजी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.
1986 च्या बॅचचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनीअर्स अधिकारी सतीश कुमार यांनी त्यांच्या 34 वर्षांच्या कारकिर्दीत रेल्वेसाठी अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. एप्रिल 2017-2019 या दरम्यान त्यांनी उत्तर रेल्वेवर लखनौ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून काम केले. उत्तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी सतीश कुमार यांनी उत्तर पश्चिम रेल्वे, जयपूरमध्ये वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आणि मुख्य दक्षता अधिकारी पदही भूषवले होते.





