राजगुरूनगर : राजगुरूनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत मंगळवार (दि. १८) छाननीच्या दिवशी पक्षाची अधिकृत उमेदवारी (एबी फॉर्म) न जोडल्याने चार नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज अवैध (बाद) ठरले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शैलजा पाटील आणि सहायक निवडणूक अधिकारी अंबादास गरकळ यांनी दिली. छाननीमध्ये प्रभाग क्रमांक दोनमधून किरण बबनराव मलघे, प्रभाग क्रमांक आठमधून रुपेश मुकुंद खांगटे, अक्षय चिमाजी पऱ्हाड तर प्रभाग क्रमांक नऊमधून सागर नागनाथ आवटे यांचे उमेदवारी अर्ज एबी फॉर्म न जोडल्यामुळे अवैध ठरले. नगराध्यक्ष पदासाठी आलेले सर्व ११ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. छाननीनंतर नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवारांचे ११ उमेदवारी अर्ज, तर दहा प्रभागातील २१ नगरसेवक पदासाठी ९९ उमेदवारांचे १६४ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात अध्यक्षपदासाठी असलेले शिवसेना (उबाठा) कडून बापू थिगळे, भाजपचे शिवाजी मांदळे, शिवसेना मंगेश गुंडाळ, आणि राष्ट्रवादी काँग्रेस किरण आहेर यांसह ॲड. दीपक थिगळे (अपक्ष) व गणेशकुमार इंगवले (अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले आहेत. शुक्रवारी (दि. २१) अर्ज मागे घेण्याची मुदत आहे, त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. अपील असल्यास २५ तारखेपर्यंत निर्णय होऊन अर्ज वैधतेची अंतिम संख्या निश्चित होणार असल्याचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी सांगितले. दरम्यान, कोणत्याही पक्षाला नगरपरिषदेच्या सर्व जागांवर उमेदवार देता आले नसल्याने बहुमत कोणत्या पक्षाला मिळणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.