राज्य सरकारकडे अर्ज करूनही दखल नाही; आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ घेणार न्यायालयात धाव

नाशिक : आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत पाठोपाठ आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ राज्य सरकार विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. राज्य सरकारकडून उत्तर महाराष्ट्रच्या खेळाडूंवर अन्याय होत असून क्रीडा प्रशिक्षकपदाची नोकरीत डावलण्यात आले असल्याचा आरोप दत्तू भोकनळने केला आहे.
काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांना राज्य सरकारकडून सरकारी नोकरी देण्यात आली. मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी कविता राऊत यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र या नियुक्तीवर कविता राऊत नाराज झाल्या. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. आता या पाठोपाठ दत्तू भोकनळही न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या दत्तू भोकनळने 2016 च्या ऑलम्पिकमध्ये ही देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. जागतिक क्रमवारीत 13 वे स्थान पटकविणारा देशातील पहिला खेळाडू असूनही अन्याय झाल्याची भावना दत्तू भोकनळने एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे. राज्य सरकारकडून उत्तर महाराष्ट्राच्या खेळाडूंवर अन्याय होत असल्याचा आरोपही दत्तू भोकनळने केला आहे. 2017 ला नोकरीसाठी अर्ज करुन देखील शासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही.
मंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा करून देखील सरकार याबाबत दखल घेत नाही. ललिता बाबरला एक न्याय आणि इतरांना दुसरा न्याय दिला जात आहे. त्यामुळे न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे दत्तू भोकनळने म्हटले आहे. दरम्यान, मागील महिन्यात 116 खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षकपदाची नोकरी देण्यात आली. त्यातही दत्तूला स्थान देण्यात आलेले नाही.





