पुणे – केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) पूर्व परीक्षा दि. 27 जून 2021 रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली. अर्ज करण्याची अंतिम मुदत 24 मार्चपर्यंत आहे, असे “यूपीएससी’ने स्पष्ट केले आहे.
“यूपीएससी’ने गुरुवारी पूर्व परीक्षेची अधिसूचना जाहीर केली. ज्या उमेदवारांना परीक्षेसाठी अर्ज करावयाचा आहे, त्यांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी, असे आवाहन “यूपीएससी’ने केले आहे.
भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि इतर नागरी सेवांमध्ये उमेदवारांच्या निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत या परीक्षा घेतल्या जातात.
या परीक्षेसाठी देशभरातून लाखो उमेदवार बसतात. त्यामुळे ही परीक्षा उमेदवारांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. आता पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्याने उमेदवारांना अभ्यासाची तयारी करणे शक्य झाले आहे.