पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कसबा विधानसभा मतदार संघात सोमवारी दहा अर्ज दाखल झाले. त्यात कॉंग्रेसचे उमेदवार आणि कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांनी अर्ज दाखल केला. तसेच माजी महापौर कमल व्यवहारे यांनीही काॅंग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. दरम्यान, भाजप-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचे दर्शन करून धंगेकर यांनी सोमवारी सकाळी सपत्नीक उमेदवारी अर्ज दाखल केला. कसबा गणपतीपासून रॅली काढण्यात आली होती. तसेच त्यांनी लाल महालातील राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर गणेश कला क्रीडा येथे अर्ज दाखल केला.
यावेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद्चंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे आदी सहभागी झाले होते.
या शिवाय येथून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या आणि माजी महापौर कमल व्यवहारे यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडून हुसेन नसरुद्दीन शेख यांनी अर्ज दाखल केला. यासह सुरेश कुमार ओसवाल, गणेश बढाई, रुपेश केसेकर आणि मुख्तार गफूर शेख यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.