Pimpri : पेट्रोलपेक्षा सफरचंदाला तिप्पट भाव

पिंपळे गुरव : शेतकऱ्यांकडून येणाऱ्या भाजीपाल्याची घटलेली आवक यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठांमध्ये भाज्यांचे दर प्रचंड वाढले आहेत. पेट्रोलपेक्षाही सफरचंद, जांभळे आणि भाज्या महाग झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे ‘किचन बजेट’ कोलमडले आहे.
किरकोळ बाजारात वांगी, दोडका, भेंडी या भाज्यांची तब्बल १२० रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. त्यापेक्षाही महाग म्हणजे शेवगा आणि फ्लावरला १६० भाव मिळत आहे. हिरव्या मिरचीचे दर ९० ते १०० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे नागरिकांनी भाजी खरेदी करताना दोनदा विचार करण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्याच्या विविध भागातून मर्यादित आवक
सध्या भाजीपाल्याची आवक मुख्यतः पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आणि मावळ तालुक्यातून होत आहे. टोमॅटो, कारले, शिमला मिरची, फुलकोबी यांच्यासह अनेक भाज्यांचे दर ५० ते १०० रुपयांच्या वर गेले आहेत. शहरातील भाजीबाजार, आठवडे बाजार, मोशी मार्केट परिसर, तसेच चिंचवड, वाकड, सांगवी, रहाटणी, आकुर्डी, निगडी, थेरगाव येथील विक्रेत्यांकडून दररोज केवळ मर्यादित पुरवठा होत आहे.
अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट
भाजी विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यापासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे स्थानिक उत्पादनात मोठी घट उत्पादनात झाली आहे. तसेच इतर जिल्ह्यातून होणारी आवकही ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. सप्टेंबरनंतर खरिपाच्या हंगामातील नवी भाजी बाजारात येईल, तेव्हाच दर काहीसे स्थिर होतील, अशी माहिती फुले भाजी विक्रेत्यांनी दिली आहे.





