अॅपलने भारतातून अमेरिकेत मागवले तब्बल 15 लाख आयफोन, कारण काय?

Apple airlifts 600 tonnes of iPhones | डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा जगभरातील अनेक कंपन्यांना फटका बसला आहे. दिग्गज टेक कंपनी अॅपलच्या उत्पादनांवर देखील याचा परिणाम पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्कात वाढ केल्यानंतर चीनवर अवलंबून राहणं महागडं ठरू लागल्याने, अॅपलने भारताकडे आपली पुरवठा साखळी वळवण्यास सुरुवात केली आहे.
चीनमधील उत्पादनांवर जास्त टॅरिफ शुल्क लागू करण्यात आले आहे. त्याचा परिणाम म्हणजे, मार्चपासून आतापर्यंत भारतातून अमेरिकेकडे सुमारे 15 लाख आयफोनची निर्यात करण्यात आली आहे.
भारतातून अमेरिकेत 600 टन आयफोन रवाना
मार्च 2025 पासून आतापर्यंत भारतातून अमेरिकेकडे 100 टन क्षमतेच्या 6 मालवाहतूक विमानांना उड्डाण घेतले आहे. यामध्ये सुमारे 600 टन म्हणजे अंदाजे 15 लाख आयफोन पाठवण्यात आले आहेत. एका आयफोन 14 आणि त्याच्या चार्जिंग केबलसह वजन सुमारे 350 ग्रॅम असल्याने हा आकडा इतका मोठा आहे.
भारतातून निर्यातीचे फायदे काय?
रिपोर्टनुसार, अमेरिकेतील आयफोनच्या किंमती वाढू नयेत म्हणून अॅपलने चीनऐवजी भारतातून आयफोन पाठवण्याचा निर्णय घेतला. चीनमधून आयात होणाऱ्या उत्पादनांवर ट्रम्प सरकारने 125% पर्यंत आयात शुल्क लावले आहे, तर भारतातून होणाऱ्या आयातवर केवळ 26% शुल्क आकारले जाते.
त्यामुळे कंपनीसाठी चीनच्या तुलनेत भारतातून माल घेणं अर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरतं आहे. सध्या ट्रम्प यांनी चीन वगळता इतर देशांवरील शुल्क 90 दिवसांसाठी स्थगित केले आहे.
भारत सरकारकडून अॅपलला सहकार्य
अॅपलने भारतात उत्पादन वाढवण्यासाठी चेन्नई येथील फॉक्सकॉन प्लांटमध्ये रविवारसुद्धा काम सुरू ठेवले आहे. गेल्या वर्षी या प्लांटमध्ये 2 कोटीहून अधिक आयफोन 15 आणि 16 मॉडेल्स तयार करण्यात आले. अॅपल 2017 पासून जुन्या मॉडेल्सची निर्मिती भारतात करत आहे. आता नवीन मॉडेल्सचे उत्पादनही येथे सुरू झाले आहे.
रिपोर्टनुसार, चेन्नई विमानतळावरील कस्टम क्लिअरन्स वेळ 30 तासांवरून 6 तासांवर आणण्यासाठी अॅपलने केलेल्या मागणीवर केंद्र सरकारने तत्काळ प्रतिसाद दिला. अधिकाऱ्यांना कंपनीला मदत करण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, अॅपलकडून दरवर्षी 22 कोटींपर्यंत आयफोन विकते. आयफोनची सर्वाधिक निर्मिती ही चीनमध्ये होते. मात्र, चीनमधून येणाऱ्या उत्पादनांवर अमेरिकेने प्रचंड टॅरिफ लावले आहे. त्यामुळे अॅपलने आता भारतात आयफोन मागवले आहेत व कंपनीकडून याचा साठा केला जाण्याची शक्यता आहे.





