Satara | शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे दिव्यांग विद्यार्थ्यांना आवाहन

सातारा, – शालांतपूर्व इयत्ता 1 ली ते 10 पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येते. या योजनेचा दिव्यांग विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांनी केले आहे.
या योजनेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दरमहा 100 ते 200 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येते. नोंदणी प्रमाणपत्रप्राप्त गतिमंदांच्या विशेष शाळांमधील 18 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरमहा 150 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. दिव्यांगांच्या कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा 300 रुपये देण्यात येतात.
या योजनेच्या लाभासाठी मागील वार्षिक परीक्षेच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत, दिव्यांग असल्याबाबत वैद्यकीय मंडळाच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत, संबंधित शिक्षण संस्थाप्रमुखांचे प्रमाणपत्र, आधारकार्डची छायांकित प्रत, आधारकार्ड संलग्न बँक खाते क्रमांक, बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत, बँकेचा आयएफएससी कोड अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा कार्यालयात संपर्क साधावा.





