सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्या, दि. 11 रोजी होणारा महाशिवरात्री उत्सव साधेपणाने साजरा करावा. शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. या संदर्भात त्यांनी आदेश जारी केले आहेत. महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरात दर्शनासाठी गर्दी होणार नाही, सामाजिक अंतराचे पालन होईल याकडे विश्वस्त, व्यवस्थापक यांनी लक्ष द्यावे.
भाविकांनी शक्यतो घरात राहून पूजाअर्चा करावी. शिवमंदिराच्या आतील बाजूस सामाजिक अंतराचे पालन होण्यासाठी एकावेळी फक्त 20 भाविक दर्शन घेतील. मंदिर परिसरात हार-फुले विक्रेत्यांची गर्दी होणार नाही. सामाजिक अंतराचे पालन होईल, याकडे मंदिराच्या व्यवस्थपकांनी लक्ष द्यावे.
मंदिरात जाणाऱ्या भाविकांनी मास्कचा वापर करावा. व्यवस्थापनाने आजूबाजूच्या परिसरात निर्जंतुकीकरण करावे. दर्शनाची ऑनलाइन सुविधा केबल नेटवर्क, बेवसाइट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन द्यावी. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ अथवा विरोध केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.