पिंपरी-चिंचवडकरांनाे काळजी घ्या : एकाच दिवसात करोनाचे अर्धशतक

  • पिंपरी-चिंचवड @ 311 ः गेल्या सात दिवसांत 96 रुग्णांची भर

पिंपरी – गेल्या 74 दिवसांपासून शहरात ठाण मांडून बसलेल्या “करोना’ने आता उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी आतापर्यंतचा उच्चांक गाठत “करोना’ने 50 जणांना बाधित केले. त्यापैकी 46 रुग्ण हे शहरातील असून 4 रुग्ण शहराबाहेरील आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात एकूण “करोनाबाधितां’चा आकडा 311 वर जाऊन पोहोचला आहे.

शनिवारी सायंकाळी हाती आलेल्या अहवालानुसार शहरातील 29 पुरुष आणि 17 स्त्रियांना “करोना’ची लागण झाली आहे. शनिवारी पॉझिटिव्ह आढळलेले 46 रुग्ण हे चिंचवड स्टेशन, पिंपरी, वाकड, भोसरी, वडमुखवाडी या परिसरातील आहेत. तर भवानी पेठ, नाना पेठ, येरवडा व खडकी येथील चार रुग्णांनाही “करोना’ची बाधा झाली आहे. तसेच इंदिरानगर, चिंचवड, आकुर्डी, चऱ्होली व थेरगाव येथील 9 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

“करोना’चा आकडा वाढत असताना “करोनामुक्‍त’ होत असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत होती. यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या आटोक्‍यात होती. परंतु गेल्या सात दिवसांतच “करोना’चे नवे सुमारे शंभर रुग्ण आढळल्याने पहिल्यांदाच शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 135 वर जाऊन पोहोचली आहे. तसेच शहराबाहेरील 24 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

“लॉकडाऊन’च्या नियमांचे पालन न करणे आता शहराला चांगलेच महागात पडत आहे. “करोना’ची लागण झालेल्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांमध्ये 42 टक्‍के तरुण, 23 टक्‍के प्रौढ नागरिक आहेत. यांच्यामुळे लहान आणि किशोरवयीन मुलांनादेखील “करोना’ची लागण झाली असून त्यांचे प्रमाण जवळपास 26 टक्‍के आहे. ज्यांना सर्वाधिक “करोना’चा धोका असतो अशा ज्येष्ठ नागरिकांचे एकूण रुग्णांमध्ये प्रमाण केवळ 9 टक्‍के इतके आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.