बँकॉक : थायलंडच्या पंतप्रधानपदी ज्येष्ठ राजकीय नेते अनुतिन चार्नविराकूल यांची निवड करण्यात आली आहे. भूमजैथाई पक्षाचे नेते अनुतिन यांनी प्रतिनिधी सभागृहाच्या ४९२ सक्रिय सदस्यांमधून आवश्यक बहुमत असलेल्या २४७ पेक्षा जास्त मते जिंकली. थायलंडचे राजे महा वजिरालोंगकोर्न यांच्याकडून औपचारिक नियुक्ती मिळाल्यानंतर काही दिवसांत ते आणि त्यांचे सरकार पदभार स्वीकारतील अशी अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात न्यायालयाच्या आदेशाने पेटोंग्टार्न शिनावात्रा यांना पंतप्रधानपदावरून बरखास्त करण्यात आल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर अनुतिन यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. शिनावात्रा यांना नैतिक मूल्ल्यांच्या उल्लंघनाप्रकरणी दोषी ठरवून घटनापिठाने पदावून हटवण्याचे आदेश दिले होते. अनुतिन हे पेटोंग्टार्न शिनावात्रा यांच्याच सरकारमध्ये मंत्री होते. मात्र पेटोंग्टार्न शिनावात्रा यांच्या फोन संभाषणाचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता आणि शिनावात्रा यांत्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमधून आपल्या पक्षाचा पाठिंबाही काढून घेतला होता. थायलंडच्या संवैधानिक नियमांनुसार २०२३ मध्ये झालेल्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नामांकित झालेले फक्त पाच उमेदवार पात्र होते.फिउ थाई पार्टी सध्या काळजीवाहू सरकार चालवत आहे. संसद विसर्जित करून नव्याने निवडणुका घेण्याचा प्रयत्न या पक्षाने केला होता. मात्र संसद विसर्जित करण्याची विनंती राजांच्या परिषदेने नाकारली होती.