चिंबळीत अनुराग जैद यांची सरशी

चिंबळी (वार्ताहर) – चिंबळी (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक चारच्या पोटनिवडणुकीत सर्वसाधारण पुरुष जागेवर अनुराग संजय जैद-पाटील यांची बहुमतांनी निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र बारवे यांनी दिली. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून बलभीम पाटील यांनी काम पाहिले.
एकूण 521 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजवला होता, त्यापैकी अनुराग संजय जैद यांना 283 मते तर अभिजित विजय जगनाडे यांना 232 मते मिळाली 6 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. अनुराग जैद हे 51 मतांनी विजयी झाले. खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती विलास कातोरे यांच्या विशेष प्रयत्नातून पहिल्यांदाच आई व मुलगा ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले आहेत.
विजयी उमेदवार अनुराग जैद, बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे यांच्या हस्ते बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी भंडारा उधळत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच विजयी फेरी चिंबळी परिसरात ही मोठ्या आनंदमय वातावरणात वाजंत्री ताफा व फटाक्यांची आतषबाजी करीत मोठ्या जल्लोषात काढण्यात आली
आई-मुलगा झाले सदस्य
चिंबळी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत आईच्या पाठोपाठ मुलगाही निवडून आला असून गावच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच आई व मुलाची जोडी ग्रामपंचायत कारभारात योगदान देणार आहे. चिंबळी (ता. खेड) : ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत अनुराग जैद यांचा विजय झाल्यानंतर भंडारा उधळत जल्लोष करण्यात आला.





