भजन सम्राट आणि “बिग बॉस’च्या निमित्ताने चर्चेत आलेले अनुप जलोटा आता अभिनय क्षेत्रामध्येही आपली चमक दाखवणार आहेत. सत्य साईबाबांच्या बायोपिकमध्ये सत्य साईबाबांच्या रोलमध्ये अनुप जलोटा दिसणार आहेत. सत्य साईबाबांना आपण 55 वर्षांपूर्वी आपल्या वडिलांबरोबर भेटलो होतो. त्यावेळी आम्ही तेथे भजनही गायले होते.
आता इतक्या वर्षांनंतर मला सत्य साईबाबांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो, असे अनुप जलोटा यांनी सांगितले. सत्य साईबाबांच्या बायोपिकचे शिर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. विकी राणावत या सिनेमाचे डायरेक्शन करणार आहेत. जॅकी श्रॉफ, साधिका रंधावा, गोविंद नामदेव, अरुण बक्षी आणि मुश्ताक खान आदी मंडळी या सिनेमामध्ये दिसणार आहेत.
सत्य साईबाबा मला “छोटा साई’ असे संबोधत असत. त्याबद्दल आपण त्यांना विचारले असता “त्याचे कारण एक दिवस समजेल.’ असे उत्तर त्यांनी दिले होते. आता ते कारण आपल्याला समजले आहे. त्यांचा रोल पडद्यावर साकारण्यासाठी आपल्याला खूप अभ्यास आणि वाचन करावे लागत असल्याचेही जलोटा यांनी सांगितले. सत्यसाई बाबांवरील बायोपिक पुढच्या वर्षी 22 जानेवारीला रिलीज होणार आहे.