राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापले असताना पेणमधून एक धक्कादायक कृत्य समोर आले आहे. पेणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीवर अद्यात तरुणांनी हिरवी चादर चढवून त्या मजार असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामुळे शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. पेण शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरात शिवकालीन सरदार वाघोजी तुपे यांची समाधी आहे. शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी रोजी काही समाजकंटकांनी एकत्र येऊन सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीवर हिरवी चादर चढविली आणि फुले वाहून ती मजार असल्याचा बनाव केला. यावेळी अशा घोषणा दिल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. यानंतर शिवप्रेमींनी समाधीवरील हिरवी चादर हटवून पोलिसांच्या ताब्यात दिली. तसेच विविध संघटनांनी या घटनेचा निषेध करीत हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. नरहरी सरदार वाघोजी तुपे यांचे वंशज विवेक मारुती तुपे यांनी पेण पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी अखिल पठाण, दानिश पठाण, रफिक तडवी आणि इतर चार जणांविरोधात भारतीय न्याय संहिता 298, 299 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.