रायपूर: छ्तीसगडमध्ये नक्षलवादाविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेला ऐतिहासिक यश मिळाले असून, गेल्या ४८ तासांत एकूण ८१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ‘साउथ सब जोनल ब्युरो’शी संबंधित ५२ जणांचा समावेश असून या शरण आलेल्या नक्षलवाद्यांवर प्रशासनाकडून एकूण १ कोटी ४१ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. ‘पूना मारगेम’ म्हणजेच नव्या पहाटेकडे या अभियानांतर्गत नक्षलवाद्यांनी हिंसेचा आणि शस्त्रांचा मार्ग सोडून लोकशाहीचा स्वीकार केला आहे. ही घटना नक्षलवादाच्या विरोधातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या धोरणात्मक विजयांपैकी एक मानली जात आहे. मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी या यशाचे वर्णन हिंसेच्या विचारधारेवर मिळालेला विश्वासाचा मोठा विजय असे केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या दोन दिवसांत झालेली ही मोठी शरणागती माओवाद आता केवळ कमकुवत होत नसून तो पूर्णपणे विखुरला जात असल्याचे स्पष्ट लक्षण आहे. जिथे कधी केवळ भीती आणि दहशतीचे वातावरण होते, तिथे आता शासन आणि प्रशासनाची भक्कम उपस्थिती निर्माण झाली असून विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे लोकांचा सरकारवरील विश्वास वाढला आहे. यामुळेच केवळ नक्षलवादी संघटनाच नव्हे, तर त्यांची विकृत विचारधारा आणि त्यांना मिळणारा अंतर्गत पाठिंबा देखील आता उद्ध्वस्त झाला आहे. सरकारच्या ‘पुनर्वास ते पुनर्जीवन’ या मोहिमेअंतर्गत भरकटलेल्या तरुणांना सन्मानाने जगण्याची आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. मुख्यमंत्री साय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाचे आभार मानत ३१ मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलमुक्त करण्याचा संकल्प अधिक वेगाने पूर्ण होत असल्याचे सांगितले. छत्तीसगडमध्ये हिंसेला कोणतेही स्थान नसून बस्तरमध्ये आता बंदुकीची जागा विकास घेत आहे. रस्ते, शाळा आणि आरोग्य सुविधांच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत प्रशासन पोहोचत असल्यामुळे नक्षलवादी चळवळ आता शेवटच्या घटका मोजत आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.