पुणे – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षेची “अन्सर की’ अर्थात उत्तरतालिका आजपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग-इनमधून उपलब्ध होत आहे. त्यावरून विद्यार्थ्यांना किती गुण मिळू शकतात, याचा अंदाज बांधणे शक्य होणार आहे.
यंदाची एमएचटी-सीईटी परीक्षा 2 ते 13 मे रोजी राज्यभरात पहिल्यादांच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेला 3 लाख 92 हजार 304 विद्यार्थी बसले होते. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आजपासून “अन्सर की’ मिळणार आहे. दरम्यान, प्रश्नांबाबत काही आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांना दि. 15 ते 18 मे या काळात एक हजार रुपये शुल्क भरून तक्रार नोंदविता येणार असल्याचे राज्य सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले.