हरियाणात आणखी एका यूट्यूबरला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक

spying for pakistan – हरियाणा पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पलवल जिल्ह्यातील हथीन तालुक्यातील कोट गावातील वसीम अकरम या यूट्यूबरला अटक केली आहे. यापूर्वी २६ सप्टेंबर रोजी पोलिसांनी आलीमेव गावातील ३५ वर्षीय तौफिक याला याच प्रकरणात अटक केली होती. तौफिकच्या चौकशीदरम्यान त्याने या हेरगिरी नेटवर्कशी संबंधित माहिती उघड केली, ज्यामुळे वसीम अकरमला पकडण्यात यश आले. क्राइम ब्रांचचे प्रभारी दीपक गुलिया यांनी याची पुष्टी केली आहे.
पाकिस्तानी दूतावासाला पुरवले सिम कार्ड –
चौकशीतून समोर आले की, २०२१ मध्ये वसीमने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानचा व्हिसा मिळवला होता. याच दरम्यान त्याची भेट पाकिस्तानी दूतावासातील कर्मचारी दानिश आणि आणखी एका कर्मचाऱ्याशी झाली. तेव्हापासून तो दानिशच्या संपर्कात होता आणि गेल्या चार वर्षांपासून व्हॉट्सअॅपद्वारे माहितीची देवाणघेवाण करत होता. तपासात असेही उघड झाले की, वसीमने दिल्लीत जाऊन पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांना एक सिम कार्ड पुरवले होते.
वसीमच्या फोनमधून पोलिसांना अनेक चॅट्स सापडल्या, ज्यापैकी काही डिलीट करण्यात आल्या होत्या. त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात देशद्रोहासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेला तौफिक हा भारतीय लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानी उच्चायोगातील एका कर्मचाऱ्याला पाठवत होता. तौफिकने २०२२ मध्ये नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला भेट दिली होती. तो लोकांना व्हिसा मिळवून पाकिस्तानला पाठवण्याचे कामही करत होता. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचारी दानिशच्या तो संपर्कात होता. सध्या पोलिस या संपूर्ण नेटवर्कबाबत तपास करत आहेत.
दानिश हाच जासूसी नेटवर्कचा मास्टरमाइंड –
नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगाचा कर्मचारी दानिश हाच या संपूर्ण जासूसी नेटवर्कचा सूत्रधार आहे. यापूर्वी मे महिन्यात हरियाणातील हिसार येथून अटक करण्यात आलेली यूट्यूबर ज्योति मल्होत्रा आणि पंजाबमधून पकडलेला आणखी एक यूट्यूबर यांचाही दानिशशी संपर्क होता. हे दोघेही पाकिस्तानला जाऊन आले होते आणि त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केले होते.
दानिश यूट्यूबर्सना आपल्या जाळ्यात ओढत असे आणि त्यांना नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगात आयोजित कार्यक्रमांना बोलावत असे. इतकेच नव्हे, तर पाकिस्तान दौऱ्यादरम्यान त्यांची तिथे पूर्ण काळजीही घेतली जात होती. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या जासूसी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.





