मुंबईला जाण्यासाठी आणखी एक मार्ग

पुणे – नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शिरुर -खेड- कर्जत असा नवीन मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केला आहे. या प्रस्तावित मार्गामुळे मराठवाडा येथून मुंबईकडे जाणारी वाहतूक शिरूर- खेडमार्गे थेट कर्जतला जाणार आहे. त्यामुळे मुंबई जाण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध होणार आहे.
मात्र, मागील अनेक वर्षांपासून फक्त कागदावरच असलेल्या या मार्गासाठी आता शासन दरबारी हालचाली सुरू झाल्या असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. या प्रकल्पाला मान्यता मिळण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालयात प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय आदी उपस्थित होते.
कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर हा नवीन महामार्ग करण्यासंदर्भात पवार यांनी आढावा घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पास गती मिळणार आहे.
सद्यस्थितीत मराठवाडा मधून येणाऱ्या वाहनांना मुंबईला जाण्यासाठी चाकण-शिक्रापूर-तळेगाव या मार्गे मुंबईला जावे लागते. चाकण आणि शिरूर येथील एमआयडीसीमुळे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी सध्या एकच मार्ग अस्तित्वात आहे. त्यामुळे हा नवीन मार्ग पुढे आला आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे देशांतर्गत सर्व प्रमुख काॉरिडॉर हे मुंबईशी जोडलेली असणे ही प्राथमिक गरज आहे. मराठवाड्याचा मोठा भाग आणि अहिल्यानगर या क्षेत्रातील मुंबईला जाणारी वाहतूक मुख्यत: पुणे मार्गे जाते. या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीचा थेट परिणाम पुणे-शिरूर या रस्त्याच्या भागातील वाहतूक कोंडीत होतो.
नगर रस्त्यावरील ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध पर्यायांचा विचार करण्यात आला होता. त्यानुसार शिरूर मार्गे थेट कर्जत जाणाऱ्या रस्त्याचा एक पर्याय समोर आला. मल्टिनोडल कॉरिडॉर म्हणून हा मार्ग ओळखला जाणार असून, हा मार्ग चार पदरी असणार आहे.
– शिरूर-पाबळ-राजगुरूनगर-शिरवलीमार्गे पाईट-वांद्रे-कर्जत असा सुमारे 135 किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित
– कर्जंत मार्ग पुढे पनवेल-उरणला जोडला जाणार
– मुंबईला जाण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होणार
– औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला चालना मिळणार
– भूसंपादन, रस्ते बांधण्यासाठी सुमारे 12 हजार कोटी खर्च अपेक्षित
– या प्रकल्पासाठी 670 हेक्टर जागेचे संपादन करावे लागणार
– बीओटी तत्त्वावर प्रकल्पाची उभारणी
– या मार्गावर पाच बोगदे असणार
– या मार्गावर सहा मोठे, 48 लहान पूल असतील





