लोणावळा -येथील पिचली हिल विभागातील एका खासगी बंगल्याच्या जलतरण तलावामध्ये बुडून एका दोन वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोणावळा शहरातील खासगी पुलमध्ये बुडून किंवा स्विमिंग पुलच्या परिसरात सुरक्षिततेची योग्य काळजी न घेतली गेल्याने मागील पाच महिन्यात तीन वेगवेगळ्या घटनेत तीन लहान चिमुरड्यांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हानियाझैरा मोहम्मदनदिम सैयद (वय एक वर्षे 11 महिने) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव असून ती डोंबिवली, मुंबई येथून आपल्या कुटुंबियांसोबत लोणावळ्यात आली होती. याप्रकरणी हानियाझैरा हिचे वडील मोहम्मदनदिम कैसरहुसेन सैयद (वय 31 वर्षे, पलवा, डोंबिवली) यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीनुसार रविवारी (दि. 27) सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मिर्जा बंगलो, पिचली हिल, बार्क हॉटेलचे पाठीमागे, खंडाळा, लोणावळा येथील जलतरण तलावामध्ये ही घटना घडली. फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय असे सगळे नाष्टा करत असताना त्यांना अचानक बाहेरुन ओरडण्याचा अवाज आला. सर्वांनी बाहेर जाऊन पाहिले असता हानियाझैरा ही जलतरण तलावातील पाण्यामध्ये पडलेली दिसली. त्यानंतर तिला पाण्यातुन बाहेर काढुन लोणावळ्यातील संजीवनी हॉस्पीटल येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी पुढील तपास लोणावळा पोलीस करीत आहे.
यापूर्वी 13 जुलै 2022 रोजी आपल्या वाढदिवसाच्या आदल्या रात्रीच शिवबा पवार नावाच्या एका दोन वर्षीय चिमुरड्याचा असाच जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला होता. तर त्यानंतर 29 जुलै 2022 रोजी अपुऱ्या सुरक्षेअभावी जलतरण तलावामध्ये खेळल्यानंतर ओल्या अंगाने शेजारच्या लाईटला हात लावल्यामुळे हरुन मसुद वाली या 13 वर्षाच्या बालकाचा शॉक लागून मृत्यू झाला होता.
त्या सर्वेचे काय झाले ?
लागोपाठ घडलेल्या दोन घटनांमुळे तसेच प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठवल्या मुळे लोणावळा नगरपरिषदेने ऍक्शन मोडमध्ये येत अनधिकृत जलतरण तलावांचा सर्व्हे सुरू केला. मात्र त्यानंतर आतापर्यंत त्या सर्व्हेचे काय झालं यासंदर्भात स्पष्ट माहिती आद्यपही पुढे आलेली नाही. त्यानंतर आता ही तिसरी घटना घडली आहे.
लोणावळा पोलीस, नगरपरिषद प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा
लोणावळा शहरातील खासगी बंगल्यांमध्ये असलेले जलतरण तलाव व त्याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून लोणावळा शहर पोलीस व लोणावळा नगरपरिषदेने अनाधिकृत जलतरण तलावांचीपासणी करत कायदेशीर कारवाई करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.