पुन्हा शिवशाही बसमध्ये धक्कादायक घटना! ती निडर बनली अन्यथा….; नेमकं त्या रात्री काय घडलं?

पुणेः गेल्या काही दिवसांपूर्वी स्वारगेट या मध्यवर्ती बसस्थानकात बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच पुण्याहून सांगलीला जाणाऱ्या शिवशाही बसमध्ये एका २४ वर्षीय तरुणीसोबत एका तरुणाने अश्लील चाळे केले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हा प्रकार पुण्याहून सांगलीला जाणाऱ्या शिवशाही बसमध्ये दि. ५ मार्च रोजी रात्री अकरा ते सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. मुलीने धाडस दाखवत सदर प्रकार या बसच्या चालक व वाहकाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे पुढे घडणारा मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने या प्रकरणी सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. आरोपीचे नाव वैभव वसंत कांबळे (वय ३४, रा. दुधारी मारुती मंदिराजवळ, वाळवा) असे आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करण्यापूर्वी त्याला बसमधील प्रवाशांनी चांगलाच चोप दिला असल्याची माहिती आहे.
नेमकं त्या शिवशाही बसमध्ये काय घडलं?
ज्या तरुणीसोबत हा घृणास्पद प्रकार घडला ती मूळची सांगली जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील रहिवाशी आहे. ५ मार्चच्या दिवशी स्वारगेट ते सांगली शिवशाही बसमधून ती सागंलीला येत होती. आरोपी वैभव कांबळे हा देखील त्या बसमध्ये होता. मध्यरात्री अकरा ते सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास आष्टा ते सांगली दरम्यान बस आल्यानंतर हा घृणास्पद प्रकार घडला. आरोपीने खडकीजवळून तसेच सीटच्या मधून हात काढून तरुणीला स्पर्श केला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने तरुणीसोबत अश्लील चाळे सुरू करण्यास सुरुवात केली. यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार बसच्या चालक आणि वाहनकांच्या निदर्शनास तिने आणून दिला. हा प्रकार बसमधील प्रवाशांच्या कानावार पडताच संतापलेल्या प्रवाशांनी तरुणाला चांगलाच चोप दिला.
अशी झाली अटकेची कारवाई
या घटनेची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याला मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने धाव घेत प्रवाशांच्या तावडीतून वैभवाला ताब्यात घेतले. तरुणीने फिर्याद दिल्यानंतर वैभव कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करण्यात आली.





