प्रभात वृत्तसेवा पुणे – बंगळुरू बाह्यवळण मार्गावर दुचाकीने मोटारीला धडक दिल्यानंतर जाब विचारणाऱ्या मोटारचालक तरुणावर कोयत्याने वार करून पसार झालेल्या एकाला आंंबेगाव पोलिसांनी अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.मृणाल दीपक जाधव (२०, रा. कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जाधवबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. तक्रारदार मोटार तरुण, त्याचा भाऊ आणि मित्र हे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरातील काॅफी शाॅपमध्ये गेले असता, आरोपी जाधव आणि दोन अल्पवयीन साथीदार दुचाकीवरून तेथे आले. दुचाकीने मोटारीला धडक दिल्याने मोटारचालक तरुणाने त्यांना जाब विचारला. त्यानंतर जाधव आणि अल्पवयीन साथीदारांनी मोटारचालक तरुणावर कोयत्याने वार केले. तरुणाचा भाऊ आणि मित्रांना मारहाण करून ते पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी तपास करून जाधव आणि अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन चोरमले, सहायक निरीक्षक फिराेज मुलाणी यांच्या पथकाने ही कारवाई केली.