महायुती सरकारची आणखी एक योजना बंद होण्याच्या मार्गावर? दिवाळीनिमित्त ‘आनंद’ नाहीच

Anandacha Shidha Yojana | तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सुरू केलेली ‘आनंदाचा शिधा’ योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. राज्यातील गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता येण्यासाठी महायुती सरकारने तीन वर्षांपूर्वी ‘आनंदाचा शिधा’ योजना सुरू केली. मात्र आर्थिक चणचणीमुळे ही योजना कागदावरच राहिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सत्तेवर आल्यानंतर गरीब आणि सर्वसामान्यांसाठी अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या होत्या. त्यामध्ये ‘लाडकी बहीण योजना’, ‘शेतकऱ्यांना मोफत वीज योजना’, ‘ज्येष्ठ नागरिक तीर्थाटन योजना’ आणि ‘आनंदाचा शिधा’ या योजना विशेष गाजल्या.
परंतु निवडणुकीनंतर निधीअभावी बहुतांश योजनांना कात्री लागण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे, लाडकी बहीण, शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मोफत वीज आदी कोणत्याही योजना बंद केल्या जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी अनेकदा जाहीर केले आहे.
दिवाळी अवघ्या 12 दिवसांवर मात्र ‘आनंदाचा शिधा’ची प्रतिक्षाच…
यंदा मराठवाडा आणि सोलापूरमध्ये अतिवृष्टी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शेती आणि घरादारांचे नुकसान झाल्यामुळे येथील सामान्य जनता हवालदिल झाली आहे. अशा परिस्थितीत किमान या परिसरात तरी सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’ पुरवला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दिवाळी अवघ्या 12 दिवसांवर येऊन ठेपली असताना सरकारी पातळीवर कोणत्याही हालचाली सुरु नसल्याने यंदा या भागांमध्येही ‘आनंदाचा शिधा’ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. Anandacha Shidha Yojana |
काय आहे ‘आनंदाचा शिधा’ योजना?
या योजनेतंर्गत दिवाळी आणि इतर सणांच्या काळात रेशनच्या दुकानांवर किट वितरित केले जायचे. यामध्ये एक किलो चणा डाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल यांचा समावेश होता. तो लाभार्थ्यांना फक्त 100 रुपयांत दिला जायचा. 2023 मध्ये गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी या सणांच्या निमित्ताने, तसेच 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सरकारने ‘आनंदाचा शिधा’ किटचे वितरण केले होते.
मात्र विधानसभा निवडणूक होऊन महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून आनंदाचा शिधा योजनेसाठी निधीच देण्यात आलेला नाही. यंदा राज्य सरकारकडून गणेशोत्सव आणि त्यानंतर दिवाळीत आनंदाचा शिधा वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही योजनाही बंद होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
हेही वाचा:
जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग ; ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू





