१) राज्यात आणखी एक ५०० कोटींचा घोटाळा मुंबईतील गोवंडी येथे बीएमसीने सार्वजनिक निधीतून तब्बल ५०० कोटी रुपये खर्चून उभारलेले ५८० खाटांचे अत्याधुनिक मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय आता खासगीकरणाच्या गर्तेत ढकलले जाण्याच्या प्रयत्नात आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणात त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोट ठेवले आहे. अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, “हा पूर्णपणे जनतेचा पैसा आणि जनतेची जमीन आहे. तरीही ५८० पैकी फक्त २६४ खाटा गरीब आणि केसरी/पिवळ्या शिधापत्रिकाधारकांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत, उरलेल्या खाटांवर खासगी रुग्णांवर उपचार करून रुग्णालयाचा व्यवसाय केला जाणार आहे. ही जनतेच्या मालकीची संपत्ती राजकीय नेते आणि खासगी रुग्णालयांच्या घशात घालण्याची खेळी आहे.” २) गुन्हा दाखल होताच अमित ठाकरे आक्रमक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे यांच्यासह ७० मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी जमावबंदी उल्लंघन आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या कलमांत गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबईतील नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळा चार महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतिक्षेत तसाच झाकून ठेवलेल्या अवस्थेत होता. अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसह आवाज उठवत झाकून ठेवलेल्या पुतळ्याचे अनावर केले होते. या प्रकरणी त्यांच्यासह मनसैनिकांवर कारवाई करण्यात आली आहे. यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रया समोर आली आहे. आता, महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा मानला जात असेल, तर भविष्यातही असे हजारो ‘गुन्हे’ मी अभिमानाने करेन, असा थेट इशारा अमित ठाकरे यांनी दिला आहे. ३) बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ठाकरे बंधु एकत्र स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतीदिनानिमित्त दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर पुन्हा एकदा ठाकरे बंधु एकत्र आले आहेत. यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली. त्यानंतर राज ठाकरे यांनी आजच्या राजकारणावर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच, असं राज ठाकरेंनी म्हटलं. ४) पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. दुपारी नवले पुलाच्या तीव्र उतारावर चार ते पाच गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक झाली आहे. गेल्या आठवड्यात नवले पुलावर भयंकर अपघात झाला होता. त्यामध्ये आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. आज दुपारच्या वेळी नवले पुलाच्या तीव्र उतारावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. अपघातानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. नवले पूलावर पुन्हा अपघात का झाला? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. ५) भारताने पहिल्यांदाच अमेरिकेसोबत केला करार अमेरिकेने वाढत्या शुल्कामुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापारी संबंधांमधील तणाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. अमेरिकेसोबत व्यापार करार होण्याची अपेक्षा असताना, भारताने पहिल्यांदाच अमेरिकेसोबत दीर्घकालीन एलपीजी आयात करारावर स्वाक्षरी केली आहे. अशा करारामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल आणि जागतिक अनिश्चिततेमध्ये पुरवठा स्रोतांमध्ये विविधता आणण्याची संधी मिळेल” असे सरकारकडून सांगण्यात आलेय. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज या कराराचे वर्णन ऐतिहासिक करार म्हणून केले आणि म्हटले की, जगातील सर्वात वेगाने वाढणारी एलपीजी बाजारपेठ असलेल्या भारताने औपचारिकपणे अमेरिकेसाठी आपली बाजारपेठ उघडली आहे. ६) शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने सोमवारी शेख हसीना यांच्याविरोधात निकाल देत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईत शेख हसीना यांच्या भूमिकेसाठी त्यांच्याविरोधात खटला सुरू होता. कोर्टाने शेख हसीना यांना १४०० जणांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सुनावणीदरम्यान शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. यामध्ये नागरिकांवर गोळीबार करणे याचा समावेश आहे. शेख हसीना यांनी आंदोलन दडपण्यासाठी आणि आंदोलकांना मारण्यासाठी प्राणघातक शस्त्रे आणि ड्रोन वापरण्याचे आदेश दिले होते. ७) नेपाळनंतर, मेक्सिकोमध्ये तणाव वाढला; ‘Gen Z’ उतरले रस्त्यावर मेक्सिकोमध्ये महापौर कार्लोस मांझो यांच्या हत्येनंतर देशभरात निदर्शने तीव्र झाली आहेत. ‘Gen Z’ यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोक भ्रष्टाचार, हिंसाचार आणि सरकारच्या अपयशाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. मेक्सिको सिटीमधील अध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांच्या निवासस्थानावर पोलिसांनी अश्रुधुराचा गोळीबार केला. निदर्शकांनी सत्तेचा गैरवापर आणि हिंसाचार थांबवण्याची मागणी केली, तर सरकारने उजव्या विचारसरणीच्या निदर्शकांवर निदर्शने भडकवल्याचा आरोप केला. या महिन्याच्या सुरुवातीला सार्वजनिक डे ऑफ द डे कार्यक्रमात महापौर कार्लोस मांझो यांची गोळीबारात हत्या करण्यात आली, ज्यामुळे मेक्सिकन राज्य मिचोआकानसह देशभरात निदर्शने सुरू झाली. ८) भारत कोणत्याही युद्धासाठी तयार देशाच्या सर्वोच्च लष्करी कमांडर आणि धोरणात्मक तज्ञांच्या उपस्थितीत होणाऱ्या चाणक्य संरक्षण संवादापूर्वी, जनरल द्विवेदी यांनी,”भारत कोणत्याही परिस्थितीत दीर्घकालीन युद्धासाठी तयार आहे आणि शत्रू पाकिस्तान असो किंवा त्याचे समर्थित दहशतवादी असो, प्रत्येक धोक्याला योग्य उत्तर देण्याची क्षमता सैन्यात आहे” असे म्हणत त्यांनी पाकला कडक इशारा दिला आहे. जनरल द्विवेदी यांनी यावेळी बोलताना,”पाकिस्तानने कितीही गुप्तपणे दहशतवादाला प्रोत्साहन दिले तरी भारतीय सैन्य त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवते” असेही म्हटले. ९) रवीना टंडनच्या मुलीला मिळाली मोठी संधी अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी आता बॉलिवूडनंतर तेलुगू चित्रपटसृष्टीतही धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. राशाने तेलूगू चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. ‘आझाद’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिने पदार्पण केले. तिने ‘ओये अम्मा’ या गाण्याने सर्वांची मने जिंकली होती. आता तिने आपला मोर्चा साऊथ चित्रपटसृष्टीकडे वळवला असून, सोशल मीडियावर नव्या तेलूगू चित्रपटाची घोषणा केली आहे. राशाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक जबरदस्त लूक शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बाईकसोबत पोज देताना दिसत आहे. या पोस्टरसोबत राशाने “नवीन सुरुवात, अंतहीन कृतज्ञता. मी तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहे.” असे कॅप्शन दिले आहे. १०) कुमार संगकाराची हेड कोचपदी नियुक्ती; राजस्थान रॉयल्सने संघात केले बदल २०२५ च्या आयपीएलमधील निराशाजनक कामगिरीनंतर राजस्थानने संघात बदल केले आहेत. त्यांनी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराला पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे. तो राहुल द्रविड यांची जागा घेणार आहे. कुमार संगकारा आता मुख्य प्रशिक्षक आणि क्रिकेट संचालक या दुहेरी भूमिकेत काम करताना दिसणार आहे. संगकाराची शांतता आणि क्रिकेट समज ही संघाला नव्या उंचीवर नेईल असा विश्वास संघाचे मालक मनोज बडाले यांनी व्यक्त केला.