प्रभात वृत्तसेवा पुणे – दौड तालुक्यातील वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरणात आरोपीची अदलाबदल केल्याची खळबळजनक चर्चा सध्या तालुक्यातील नागरिक दबक्या आवाजात करीत आहेत. यवत पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यात मुळशी तालुक्यातील आणखी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा माजी पदाधिकारी मुळशी तालुक्यातील आहे.या प्रकरणी मारुंजीचे माजी उपसरपंच हिरामण ऊर्फ कालू युवराज बुचडे (रा. मारुजी) यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्राकडून दिली जात आहे. त्यामुळे आरोपींची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. अजून यात नक्की किती जणांचा सहभाग आहे? पोलीस प्रशासन याबाबत अजून माहिती लपवल्याचे बोलले जात आहे.दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर न्यू अंबिका कलाकेंद्रामध्ये झालेल्या गोळीबाराची दडपलेली घटना आमदार रोहित पवारांच्या ट्विटमुळे बाहेर पडली. दाबलेल्या प्रकरणाला पोलिसांना जनतेसमोर उघड करावे लागले. सत्ताधारी आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह गणपत जगताप, चंद्रकांत मारणे, रघुनाथ आव्हाड यांना एकत्र अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर केले होते. तीन आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी दिली होती. मात्र एक आरोपी न्यायालयात उशिरा पोहचल्याने त्याला दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपीची अदलाबदल केली असल्याची उलट सुलट चर्चा सुरु झाली. मात्र, पोलीस प्रशासनास अंबिका कलाकेंद्राच्या व्यवस्थापकांनी उशिरा माहिती दिल्याने गुन्हा दाखल झाला. मात्र, कलाकेंद्राचे मालक तेथे असताना देखील हा प्रकार दडपण्याच्या प्रयत्न करीत होते. त्यामुळे पोलीस यामध्ये केवळ चारच आरोपी असल्याचे ठाम होते. अजूनही प्रकरण दडपण्यासाठी दबावतंत्राचा अजूनही वापर सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यवत पोलिसांनी (दि.२९) मारुंजीचे माजी उपसरपंच हिरामन बुचडे यांना मारूंजी येथून ताब्यात घेतले आहे. कला केंद्रात गोळीबार नेमका कोणी केला, हेही अद्यापर्यंत पोलिसांनी स्पष्ट सांगितले नाही. तपास सुरू असल्याचे कारण देत अजूनही चालढकल करण्याचा प्रकार पोलिसांकडून सुरू आहे. गणपत जगताप यांचे पिस्तूल आहे. मात्र, आमदार बंधू बाळासाहेब मांडेकर यांनी जगताप यांच्या पिस्तूलमधून गोळीबार केल्याचे समजत आहे. त्यामुळे संपूर्ण गोळीबार प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पोलीस ठाण्यात आरोपी काळ्या कपड्याने झाकले.. आरोपी पकडल्यानंतर न्यायालयापर्यंत आणि न्यायालयातून बाहेर आल्यानंतर आरोपींना पोलीस कोठडीत ठेवले. मात्र, पोलीस ठाण्यातील अंतर्गत खोल्यांमध्ये चौकशीसाठी आरोपींना काळ्या कपड्याने झाकल्याने त्याच्यावर नागरिक शंका उपस्थित करीत आहेत. काळ्या कपड्याने चेहरे झाकले. मात्र, एक आरोपीच बदलल्याची चर्चा जोर धरत असून नक्की हा प्रकार उजेडात येऊ नये, यासाठी काळ्या कपड्याने त्यांचे चेहरे झाकले नाहीत ना, अशी शंका उपस्थित होत आहे.