पुणे -“डीआरडीओ’चे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरांप्रमाणे हवाई दलातील आणखी एका अधिकाऱ्याला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने मोहजालात (हनी ट्रॅप) अडकविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती एटीएसने सोमवारी विशेष न्यायालयात दिली. याप्रकरणी विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी कुरुलकर यांच्या कोठडीत दि. 16 मेपर्यंत वाढ केली. कुरुलकर यांना पाकिस्तानातून काही ई-मेल पाठविण्यात आले. कुरुलकर यांनी देशाच्या सुरक्षेला बाधा आणणारी काही छायाचित्रे पाठविल्याचा संशय आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप आणि मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून याबाबतचा अहवाल मिळाला आहे. कुरुलकर यांच्या उपस्थितीत मोबाइल संचातील काही माहिती घ्यायची आहे. तांत्रिक तपासासाठी कुरुलकर यांना एक दिवस कोठडी मिळावी, अशी विनंती सरकारी वकील ऍड. चंद्रकिरण साळवी यांनी केली. कुरुलकरांप्रमाणे हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी निखील शेंडे यांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. शेंडे सध्या बंगळुरूत नियुक्तीस आहेत. याप्रकरणी हवाई दलातील अधिकारी शेंडे यांची एटीएसकडून चौकशी करण्यात आली असून त्यांचा शिवाजीनगर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाबही नोंदविण्यात आला आहे, असे एटीएसच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी विशेष न्यायालयात सांगितले. कुरुलकर यांच्या वतीने ऍड. ऋषिकेश गानू यांनी बाजू मांडली. पाकिस्तानातून संदेश पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने हवाई दलातील अधिकारी निखील शेंडे यांना मोहजालात अडकविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली. शेंडे यांची बंगळुरूतील हवाई दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. शेंडे यांचा न्यायालयासमोर जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. कुरुलकर आणि शेंडे यांना पाठविण्यात आलेले संदेश पाकिस्तानी आयपीस ऍड्रेसवरून पाठविण्यात आल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली.