भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे तुमसर-मोहाडीचे आमदार राजू कारेमोरे यांना पोलिसांना अश्लील शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. मात्र, न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून चांगली प्रतिमा असल्याचे नोंदवत, पुढील दोन वर्षे शिस्तीत राहण्याच्या तंबीसह सुटका केली आहे. न्यायाधीश भारती काळे यांनी दिलेल्या निकालात आमदार कारेमोरे यांना कलम १४३ (बेकायदा जमाव), २९४ (अश्लील भाषा) आणि ५०४ (जाणीवपूर्वक अपमान) अंतर्गत दोषी ठरवले. मात्र, कलम ३५३ (शासकीय कामात अडथळा) अंतर्गत निर्दोष मुक्तता देण्यात आली. न्यायालयाने अटी घालून सांगितले की, पुढील दोन वर्षांत कोणत्याही वादात न पडता लोकप्रतिनिधीला शोभेल अशी वागणूक ठेवावी. नेमकं प्रकरण काय? ३१ डिसेंबर २०२१ रोजी आमदार कारेमोरे यांच्या मित्र यासीन छवारे आणि इतर तीन जणांची गाडी मोहाडी-तुमसर मार्गावर पोलिसांनी अडवली. त्यांच्यावर मारहाण करून गाडीतील ५० लाख रुपये लुटल्याचा आरोप कारेमोरे यांनी केला. संतापलेल्या कारेमोरे यांनी त्या रात्री मोहाडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली आणि धिंगाणा घातला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ३ जानेवारी २०२२ रोजी कारेमोरे यांच्यासह चार सहकाऱ्यांना अटक केली होती. एकिकडे राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळा प्रकरणात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि अटक वॉरंट जारी झाले असताना, आता अजित पवार गटाच्या आणखी एका आमदारावर न्यायालयाचा निकाल आला आहे. मात्र, कारेमोरे यांना शिक्षा न होता फक्त तंबी मिळाल्याने त्यांची आमदारकी आणि राजकीय कारकीर्द सध्या तरी सुरक्षित आहे. हे प्रकरण २०२२ मध्ये मोठे वादग्रस्त ठरले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.