ठाकरे सरकारचे आणखी एक मंत्री तपास यंत्रणेच्या रडारवर; ईडीकडून प्राजक्त तानपुरेंची तब्बल ७ तास चौकशी

मुंबई : सक्तवसुली संचलनालयाकडून महाविकास आघाडीच्या अनिल देशमुख, अनिल परब, अर्जुन खोतकर आणि एकनाथ खडसे यांची चौकशी केल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे या यादीमध्ये आता आणखी एका नेत्याची भर पडल्याचे दिसत आहे. काल ईडीकडून राज्यमंत्री प्राजक्त तानपुरे यांची चौकशी केल्याचे समोर आले आहे.
प्राजक्त तानपुरे यांच्या चौकशीने आता पुन्हा एकदा राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तव्यात येत आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून ही चौकशी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक यांच्या लिलावात प्राजक्त तनपुरे यांनी एक साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप आहे.
ईडीने समन्स बजावत प्राजक्त तनपुरे यांना हजर राहण्यास सांगितले होते. दुपारी ३ वाजता सुरु झालेली प्राजक्त तनपुरे यांची चौकशी १० वाजेपर्यंत सुरु होती. तब्बल सात तासांनी प्राजक्त तनपुरे ईडीच्या कार्यालयाबाहेर आले.
NCP leader Prajakt Tanpure being questioned by ED in connection with a money laundering case involving Maharashtra State Co-op Bank
— ANI (@ANI) December 7, 2021
दरम्यान बाहेर आल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिल्याचे सांगितले. मला आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ईडीने चौकशीला बोलावलेले होते. मात्र ईडीचे अधिकारी एका बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे तीन वाजल्यापासून चौकशीला सुरुवात झाली अशी माहिती त्यांनी दिली.
पुढे ते म्हणाले की, “राज्य सहकारी बँकेसंदर्भात बोलावण्यात आले होते. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकार उत्तरे दिली आहेत. काही तांत्रिक गोष्टी ज्या आकडेवारीसहित माझ्याकडे उपलब्ध नाहीत त्यासाठी बोलावल्यास मी पुन्हा हजर होईन असे त्यांनी यावेळी सांगितले.





