प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी लटकली ; शेतकरी वर्गात नाराजी

अतिवृष्टीची भरपाईदेखील तातडीने मिळण्याची मागणी
जिल्हा प्रतिनिधी
पुणे – महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान मिळणार आहे. यामुळे प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. या योजने अंतर्गत हे पैसेही तीन टप्प्यात मिळणार असल्यशाचे घोषित केले असले तरी अद्याप पहिल्याच यादीतील सर्व शेतकऱ्यांना पैशांचे वितरण झराले नसल्याचे समोर आले आहे.
तसे पाहायला गेले पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना पैशांचे वाटप दिवाळीपूर्वीच होणे अपेक्षित होते. परंतु दिवाळीनंतर सुद्धा यामध्ये दिरंगाई झाल्यामुळे साहजिकच दुसरी यादी देखील उशिरा लागण्याची शक्यता आहे. दुसरी यादी दिवाळी नंतर लगेचच म्हणजे 1 नोव्हेंबरला येणे अपेक्षित असताना, तांत्रिक अडचणीचे कारण देत ही प्रतीक्षा आणखीनच वाढली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

महाविकास आघाडी सरकारने ही योजना सुमारे तीन वर्षांपूर्वी नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केली होती; परंतु याची प्रत्यक्ष कार्यवाही सध्याच्या शिंदे- फडणवीस सरकारने केली आहे. परतीच्या पावसाने खरिपाचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास वरुणराजाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या प्रकरणांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तरी राज्य शासनाने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
सन 2017 ते 2020 या तीन वर्षांपैकी दोन वर्षे नियमितपणे पीक कर्जाची परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. या संदर्भातली पहिली यादी 12 ऑक्टोबर 2022 रोजी प्रकाशित करण्यात आली. या पहिल्या यादीमध्ये सर्वसाधारणपणे सर्वात जास्त लाभार्थी शेतकरी संख्या जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची होती. यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली होती; परंतु ही यादी प्रकाशित केल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांचे केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित केले जातील.

असे सांगण्यात आले. दिवाळीपूर्वी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतील अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्याप्रमाणे बऱ्याच साऱ्या बॅंकांच्या माध्यमातून पैशांचे वाटप झाले तसेच बरेच जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप झाले; परंतु काही तांत्रिक अडचणींमध्ये अडकलेल्या बॅंकांचे शेतकऱ्यांच्या अनुदानाचे अद्यापपर्यंत वाटप करण्यात आलेले नाही. त्यातील त्रुटी दूर करत अनुदन वाटप तातडीने होणार असल्योच सांगण्यात आले.





