पुणे जिल्हा | जांबूतमध्ये आणखी एक बिबट्या जेरबंद

जांबूत, (वार्ताहर)- येथील कळमजाई मळ्यात लावण्यात आलेल्या पिंजर्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मागील आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर हा दुसरा बिबट पकडण्यात आला असून नरभक्षक बिबट्या अजूनही मोकाटच असल्याने त्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
जांबूत येथे मुक्ताबाई खाडे या महिलेचा 26 ऑगस्ट रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. वनविभागाने नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी व परिसरात 15 ठिकाणी पिंजरे लावले होते.
मंगळवारी (दि. 3) रात्री कळमजाई परिसरात लावण्यात आलेल्या पिंजर्यात चार ते पाच वर्षांची बिबट मादी पिंजर्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. यापूर्वी 28 ऑगस्ट रोजी एक बिबट मादी पिंजर्यात जेरबंद झाली होती.
जांबूत येथे सध्या तेरा ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. पिंजर्यात अडकलेल्या दोन्ही मादी बिबट्यांना माणिकडोह येथील निवारण केंद्रात सोडण्यात आले असून महिलेवर हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या अजूनही मोकाटच असल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पहायला मिळत असून वनविभाग नरभक्षक बिबट्याला पिंजर्यात कधी जेरबंद करणार? असा प्रश्न जांबूत येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.





