नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आम आदमी पक्षाला (आप) राजधानीत सातत्याने धक्के बसत आहेत. आता दिल्ली महानगरपालिकेतील एकमेव तृतीयपंथी नगरसेविका बॉबी यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. बॉबी यांनी ‘आप’ सोडून नव्याने स्थापन झालेल्या इंद्रप्रस्थ विकास पक्षात प्रवेश केला आहे. बॉबी तृतीयपंथी यांनी २०२२ च्या महानगरपालिका निवडणुकीत सुलतानपूर माझरा विधानसभा क्षेत्रातील वार्ड ४३ (सुलतानपुरी-ए) मधून ‘आप’च्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. त्यांच्यापूर्वी ‘आप’च्या १५ नगरसेवकांनी अरविंद केजरीवाल यांची साथ सोडली असून, हे सर्व १६ नगरसेवक आता इंद्रप्रस्थ विकास पक्षाचे सदस्य बनले आहेत. या घटनेमुळे दिल्लीतील ‘आप’च्या राजकीय संकटात आणखी भर पडली आहे. पक्षांतर्गत नाराजी आणि नेतृत्वाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना ही बंडखोरी ‘आप’साठी मोठा झटका मानली जात आहे.