Bangladesh News: बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावरील हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. राजबारी जिल्ह्यातील पांगशा भागात एका हिंदू तरुणाची संतप्त जमावाने बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२४ डिसेंबर) घडली. मृत तरुणाचे नाव अमृत मंडल उर्फ सम्राट असे आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, ही हत्या खंडणीखोरीच्या रागातून झाल्याचा प्राथमिक दावा स्थानिक पोलिसांनी केला आहे. नेमकं प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, अमृत मंडल याने ‘सम्राट वाहिनी’ नावाची एक संघटना तयार केली होती. स्थानिक रहिवाशांच्या दाव्यानुसार, अमृत आणि त्याचे साथीदार हुसेनडांगा भागातील एका घरात शिरले आणि त्यांनी खंडणीची मागणी केली. घरमालकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याच्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी घरच्यांनी ‘चोर-चोर’ असा आरडाओरडा केल्यावर गावकरी मोठ्या संख्येने गोळा झाले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमृत मंडलला जमावाने पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली. पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळावरून अमृतचा सहकारी मोहम्मद सलीम याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून एक पिस्तूल आणि काही शस्त्रे जप्त केली आहेत. या प्रकरणावर बोलताना पोलिसांनी सांगितले की, अमृत मंडल हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. अवामी लीग सरकारच्या काळात तो भारतात पळून गेला होता आणि काही दिवसांपूर्वीच पुन्हा बांगलादेशात परतला होता. त्याच्यावर हत्येसह दोन गंभीर गुन्हे दाखल होते. तो परिसरात टोळी चालवून खंडणी उकळत असल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे, ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’चे (BNP) नेते तारिक रहमान १७ वर्षांनंतर लंडनहून ढाक्यात परतले आहेत. त्यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या हत्येमुळे बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाचीही अशाच प्रकारे हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्यात आला होता. सुरुवातीला त्यावर ईशनिंदेचा आरोप ठेवण्यात आला होता, जो नंतर पोलिसांनी फेटाळून लावला. या सलग होत असलेल्या हत्यांमुळे युनूस सरकारवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून टीकेची झोड उठत आहे.