सातारा – मेळघाट व्याघ्र प्रकरल्पातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आणि कोकणातील पोस्ट खात्यातील पोस्ट मास्तर पदावरील पूर्वी तुरे यांच्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता साताऱ्यातील कोयनानगर येथील कोयना बाधकाम विभागातील कर्माचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
संतोष बंडू कुंभार (लिपिक, कोयना बांधकाम विभाग) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कुंभार यांनी शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संतोष कुंभार हे जून 2020 मध्ये जलसंपदा विभागातील कोयना बाधकाम विभागात लिपिक पदावर रुजू झाले होते. त्यांनी कर्जबाराजीपणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून कोयनानगर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, एकाच आठवड्यात तीन सरकारी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या आत्महत्यांमुळे प्रशासनासह जनतेत चिंतेचे वातावरण पसरले आहे. 25 मार्च रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण, 27 मार्च रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरूड पोस्ट ऑफिसमधील पोस्ट मास्तर पूर्वी तुरे आणि आता संतोष कुंभार यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.