वॉशिंग्टन – संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंध लादलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा ही पाकिस्तानची कुटिल गुप्तचर संस्था आयएसआयएसचे प्रतिनिधित्व करते, कारण लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराकडूनच प्रशिक्षण दिले जाते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे, असे जॉर्जटाऊन विद्यापीठाच्या ख्रिस्तियन फेयर यांनी हडसन इन्स्टिट्यूट येथे झालेल्या विचारवंतांच्या गोलमेज परिषदेत सांगितले. पाकिस्तान सरकारचे पाठबळ असल्यानेच तोयबा इतकी सक्षम दहशतवादी संघटना झाली आहे, असे त्यांनी भारतात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा संदर्भ देत सांगितले. “लष्कर-ए-तोयबा’ ही संघटना आयएसआयएसचे प्रतिनिधित्व करते किंवा प्रतिनिधित्व करावे, अशा प्रकारेच या संघटनेची स्थापना करण्यात आली, असे फेयर यांनी सांगितले. “इन देयर ओन वर्डस ः अंडरस्टॅण्डिंग लष्कर-ए-तोयबा’या पुस्तकाच्या ख्रिस्तियन फेयर या लेखिका आहेत. घटनेला मी मानणारी असल्याने काश्मिरातील कलम निष्प्रभ करण्याच्या भारताने केलेल्या कृतीचे मी समर्थन करते. कलम 370 च्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमध्ये धर्माच्या आधारावरच अपमानजनक आणि भेदभाव केला जात होता, असे त्यांनी सांगितले. हिंदू डोगरा समाजाने महाराजा हरिसिंह यांची साथ सोडून नॅशनल कॉन्फरन्समध्ये डेरेदाखल झाल्याने कलम 370 हे काश्मिरी मुस्लिमांच्या ऐक्याचा आधारवड कसा ठरू शकतो, याबाबत मी संभ्रमावस्थेत असल्याचे त्या म्हणाल्या. या बाबी कशा हाताळल्या गेल्या याबाबत भारतीयांमध्ये जागृती नव्हती. काश्मीरमध्ये पाकिस्तान निश्चितपणे आगळीक करेल, त्यामुळे काश्मिरातील सुरक्षा वाढवणे आवश्यक आहे. यापेक्षा दुसरा कोणताही चांगला मार्ग उपलब्ध नाही. पाकिस्तान चर्चेच्या माध्यमातून काश्मीर प्रश्न सोडवणार नाही, असे त्यांनी सांगितले.