पिंपरी – रस्ता ओलांडणाऱ्या भटक्या श्वानाला धडक देऊन ठार करणाऱ्या कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. एम्पायर इस्टेट, चिंचवड या ठिकाणी अपघात झाला. इमारतीवरून भटक्या कुत्र्याला फेकून देणाऱ्यावर यापूर्वी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वंदना अशोक मिश्रा (वय 55, रा. एम्पायर इस्टेट, चिंचवड) यांनी शुक्रवारी (दि. 18) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील संत मदर टेरेसा पुलाखालून तीन ते चार भटकी श्वाने रस्ता ओलांडत होते. त्या वेळी भरधाव आलेल्या एका पांढऱ्या कारने त्यातील एका श्वानाला जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या श्वानाचा मृत्यू झाला. दाखल तक्रारीनुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दळवी अधिक तपास करत आहेत.