उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; राज्यपाल नियुक्त आमदारांची मागील सरकारची यादी शिंदे सरकारकडून मागे

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या सर्व निर्णयांना शिंदे सरकारकडून खो देण्यात येत आहे. त्यातच आता शिंदे सरकारनी मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी शिंदे सरकारकडून मागे घेण्यात आली असल्याची माहित समोर येत आहे.मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ही यादी मागे घेत असल्याचे पत्र पाठवले होते.
तत्कालीन ठाकरे सरकारने 12 नोव्हेंबर 2020 मध्ये 12 नावांची यादी राज्यपालांकडे दिली होती. मात्र राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये वादही समोर आले होते. मात्र दरम्यानच्या काळात सरकार बदलल्यानंतर आता ही यादीच मागे घेण्यात येत असल्याचे पत्र शिंदे सरकारने दिले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रत्येकी चार-चार अशी 12 जणांची नावे राज्यपाल नियुक्त आमदारीसाठी पाठवण्यात आली होती. मात्र आता ती परत घेण्यात आली असून शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 नावे लवकरच राज्यपालांकडे पाठवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या नावांवर अंतिम चर्चाही झाली असल्याची माहिती आहे. या 12 नावांसाठी अनेक नेत्यांनी लॅाबिंग देखील सुरु केली आहे.
आमदारांचे संख्याबळ पाहता भाजपला 12 पैकी 8 तर शिंदे गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. आता या 12 नावांमध्ये नेमकी कोणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न शिंदे आणि फडणवीसांसमोर आहे.




