“कचरामुक्त शहर’ स्पर्धेत “पंचतारांकित’ दर्जा नाकारला
प्रशासनाचा भांडाफोड; कोट्यवधी रुपये खर्चून “स्टार’ नाही
पिंपरी – मागील तीन वर्षांपासून स्वच्छ सर्व्हेक्षणात घसरण होणाऱ्या पिंपरी – चिंचवड महापालिकेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. केंद्र सरकारच्या कचरामुक्त स्पर्धेत शहराचा “कचरा’ झाला असून पंचतारांकित (फाईव्ह स्टार रेटिंग) दर्जा शहराला नाकारण्यात आला आहे. केंद्राकडून महापालिकेला साधा एका स्टारचाही दर्जा मिळालेला नाही. यामुळे स्वच्छतेवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या प्रशासनाचा भांडाफोड झाला आहे. तर, स्वच्छतेसह “कचरामुक्त’ स्पर्धेत महापालिका अपयशी ठरल्याने सत्ताधारी भाजपलाही मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस महापालिकेत सत्तेत असताना पिंपरी – चिंचवड शहराला “बेस्ट सिटी’ पुरस्कार मिळाला होता. तसेच स्वच्छतेत सन 2016 मध्ये राज्यात पहिला तर देशात नववा क्रमांक मिळाला होता. परंतु, महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून मागील तीन वर्षांत स्वच्छ स्पर्धेत शहराचा कचरा होत चालला आहे. 2017 मध्ये नवव्या क्रमांकावर असलेले शहर थेट 72 व्या क्रमांकावर फेकले होते. तर, 2018 मध्ये शहर देशात 43 व्या तर राज्यात सहाव्या क्रमांकावर होते. त्यानंतर 2019 मध्ये देशात 52 वा तर राज्यात 13 वा क्रमांक आला होता. स्वच्छतेवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करुनही शहराची घसरण सुरुच आहे. आता स्वच्छ सर्व्हेक्षणाचाच एक भाग असलेल्या “कचरामुक्त’ स्पर्धेतही शहराचा कचरा झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत मोहिमेतंर्गत दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणासाठी देशातील मोठ्या शहरांमध्ये स्पर्धा घेतली जाते. या वर्षीपासून त्यात कचरामुक्त शहरांसाठी मानांकनाचा समावेश केला होता. फाइव्ह स्टार, थ्री स्टार आणि वन स्टार अशा तीन स्वरूपात त्याची वर्गवारी करण्यात आली होती. देशभरातील 1435 शहरांनी स्टार रेटिंगसाठी प्रस्ताव पाठविले होते. या रेटिंगसाठी कचरा प्रक्रिया, संकलन, वर्गीकरण 100 टक्के बंधनकारक करण्याचे निकष होते. त्याचबरोबर नदी, नाले, शहरातील तलाव यांची स्वच्छता, उपाययोजनांचा समावेश होता.
त्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेने यंत्रणेला कामाला लावले. त्यावर लाखो रुपयांचा खर्च केला. महापालिकेने पंचतारांकित दर्जासाठी प्रस्ताव पाठविला. मात्र, देशातील इतर शहरांच्या तुलनेत स्वच्छतेच्या बाबतीत निश्चित केलेल्या निकषांमध्ये पिंपरी महापालिकेला स्थान मिळविता आलेले नाही.
कचरामुक्त शहरासाठीच्या सर्वच निकषांनुसार महापालिकेने फाइव्ह स्टार रेटिंगसाठी प्रस्ताव पाठविला होता. मात्र, दोन गोष्टीमध्ये शहर परिपूर्ण नसल्यामुळे केंद्र सरकारने फाइव्ह स्टार रेटिंग नाकारल्याचे सांगितले आहे. तपासणीत काही चूक झाली का, याची शंका आहे. त्यामुळे खात्री केली जाईल. साईट सर्व्हेक्षणामध्ये काही कमतरता जाणवली का, याची खातरजमा केली जाणार आहे. खरोखरच काही उपाययोजना राहिल्या असतील तर, त्या दुरुस्त केल्या जातील. पण, त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर सुधारणा होईल.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका