सरकारी कर्मचाऱ्यांची खाती ऍक्सिस बॅंकेत वळविल्या प्रकरणी नोटीस
नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आणखी एक दणका दिला आहे.
पदाचा गौरवापर करुन सरकारी कर्मचाऱ्यांची खाती ऍक्सिस बॅंकेत वळविल्याच्या प्रकरणात नागपूर खंडपीठाने फडणवीस यांच्यासह राज्याच्या मुख्य सचिवांनाही नोटीस बजावली आहे.
या नोटीसमध्ये देवेंद्र फडणवीसांना आठ आठवड्यात उत्तर देण्यास बजावले आहे. मोहनीश जबलपुरे यांनी फडणवीसांविरोधात याचिका दाखल करुन त्यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची पगाराची खाती सरकारी बॅंकेऐवजी ऍक्सिससारख्या खासगी बॅंकेत वळवल्याचा आरोप आहे.
महत्त्वाचे म्हणजे याच बॅंकेत फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस उच्च पदावर कार्यरत होत्या. त्यामुळे फडणवीसांनी पदाचा गैरवापर करुन सरकारी बॅंकेऐवजी खासगी बॅंकेत खाती वळवली असा आरोप याचिकाकर्त्याचा आहे.
तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानुसार ही खाती वर्ग करण्यात आल्याचा दावा करत नागपूरमधील सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी ऑगस्टमध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) याचिका दाखल केली होती.
अमृता फडणवीस ऍक्सिस बॅंकेच्या उपाध्यक्ष आणि पश्चिम भारताच्या कॉर्पोरेट प्रमुख आहेत. या हस्तांतरणाचा फायदा “ऍक्सिस बॅंके’ला झाला. मात्र स्टेट बॅंकेला मोठा तोटा सहन करावा लागला, असा दावा जबलपुरे यांनी केला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही वेळोवेळी स्पष्टीकरण देऊन, आपण असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचा दावा केला आहे.
मार्च 2005 मध्ये म्हणजेच अमृता यांच्याशी लग्न होण्याच्या आठ महिने आधीच ही खाती ऍक्सिस बॅंकेत उघडली गेल्याचा दावा फडणवीसांनी यापूर्वी केला होता.